महागाईविरोधात मोर्चात काँग्रेसचा सवाल
काँग्रेस आघाडीचे सरकार सत्तेत असताना महागाईच्या विरोधात गळा काढणारे भाजपचे नेते आता गेले कुठे, असा सवाल काँग्रेसने मंगळवारी केला आहे. डाळीचा भाव २०० रुपये किलोवर गेला तरी भाजपकडून काहीच प्रतिक्रिया व्यक्त केली जात नसल्याने या दरवाढीस भाजपचे समर्थन आहे का, अशी विचारणा काँग्रेसने केली आहे.
सणासुदीच्या काळात झालेल्या महागाईच्या निषेधार्थ मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने थाळी आणि लाटणे आंदोलन केले. यूपीए सरकारच्या काळात डाळीचा भाव २४ रुपयांवरून ५५ रुपये झाल्यावर भाजपच्या नेत्यांनी किती गहजब केला होता. हेमा मालिनी आणि अन्य नेत्यांनी आंदोलन केले होते. भाजपच्या प्रवक्त्यांना उकळ्या फुटल्या होत्या. किती महागाई, असा सवाल केला जात होता. भाजप सरकारच्या काळात डाळीचे भाव २०० रुपयांवर गेले तरी भाजपचे नेते गप्प कसे, असा सवाल निरुपम यांनी केला. तूरडाळ पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका या राष्ट्रांमध्ये किलोला ७० रुपयांपेक्षा कमी दराने विकली जात असताना महाराष्ट्रात एवढे दर कसे, असा सवाल त्यांनी केला. साठेबाजांवर अंकुश ठेवण्यात सरकार अपयशी ठरल्यानेच दरवाढ झाल्याचा आरोप निरुपम यांनी केला.
या वेळी माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंग, खासदार हुसेन दलवाई, वर्षां गायकवाड, शीतल म्हात्रे आदी उपस्थित होते.