काँग्रेसचा पालिकेतील सत्ताधाऱ्यांना इशारा

पालिका निवडणुका तोंडावर आल्यामुळे मुंबईकरांना पेंग्विनचे दर्शन घडविण्याची सत्ताधारी शिवसेनेला घाई झाली आहे. घाईघाईत पेंग्विन प्रदर्शनाचा कार्यक्रम उरकण्याचा घाट घालण्यात आला आहे. मात्र जोपर्यंत पेंग्विन प्रकरणाची चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत त्यांच्या प्रदर्शनाचा कार्यक्रम होऊ देणार नाही. जर कार्यक्रम आयोजित केला तर तो उधळून लावला जाईल, अशा इशारा काँग्रेसकडून देण्यात आला आहे.

मुंबईकर आणि देशीविदेशी पर्यटकांना पेंग्विन दर्शन घडावे यासाठी पालिकेने १.४३ कोटी रुपये खर्च केले. ‘हायवे कन्स्ट्रक्शन’ कंपनीमार्फत पालिकेने दक्षिण कोरियातून आठ पेंग्विन मुंबईत आणले आणि भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात ठेवण्यात आले. यापैकी एका पेंग्विनचा काही दिवसांतच मृत्यू झाला. मुंबईतील वातावरण मानवणे अवघड असल्याने पेंग्विन आणू नये, अशी मागणी विरोधक करीत होते.

मात्र शिवसेनेच्या बालहट्टापायी मुंबईत पेंग्विन आणण्यात आले, असा आरोप काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी पालिका मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केला. तत्पूर्वी त्यांनी पालिका आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याकडे निवेदन सादर केले.

‘हायवे कन्स्ट्रक्शन’ कंपनीने पेंग्विन खरेदी करताना बनावट कागदपत्रे सादर केल्याचे उघडकीस आले असून या प्रकरणाची पालिका उपायुक्त किरण आचरेकर यांना चौकशी करण्याचे आदेश पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले आहेत. या चौकशीचा अहवाल अद्याप सादर झालेला नाही. हा अहवाल सादर होत नाही, तोपर्यंत पेंग्विन प्रदर्शन कार्यक्रम आयोजित करू नये,असा इशारा नितेश राणे यांनी दिला.

उच्च न्यायालयात याचिका दाखल

भायखळा प्राणिसंग्रहालयात वास्तव्यास असलेल्या ‘पेंग्विन’चे सर्वसामान्यांना ‘दर्शन’ करण्याविरोधात दोन वकिलांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका केली आहे. अद्वैत सेठना आणि ऋजू ठक्कर या दोन वकिलांनी ही याचिका केली असून पेंग्विनला भारतात आणल्याबद्दल त्यांनी या याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. पेंग्विन दुर्मीळ प्रजातींपैकी आहे आणि त्यांना पोषक वातावरणापासून दूर आणून त्यांना त्यांच्या जीवन जगण्याच्या आणि स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारांपासून दूर करण्यासारखे आहे, असा दावाही केला आहे.