News Flash

जिल्हा परिषदांसाठी शिवसेनेशी आघाडीची तयारी

पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेबरोबर आघाडी करण्याची तयारी काँग्रेसने केली आहे.

उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरात यांचे संकेत

मुंबई : नवीन वर्षांच्या प्रारंभालाच होणाऱ्या नागपूर, अकोला, वाशिम, धुळे व नंदुरबार या पाच जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेबरोबर आघाडी करण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी तसे संकेत दिले.

राज्यात शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही शिवसेनेबरोबर सूर जुळविण्याचे काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत. पाच जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या निमित्ताने त्याची सुरुवात केली जाणार आहे.

मागील दीड-दोन वर्षांपासून आरक्षणाच्या मुद्दय़ावरून नागपूर, अकोला, वाशिम, धुळे व नंदुरबार या पाच जिल्हा परिषदांच्या निवडणुका घेण्याचे रखडले होते. प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले होते. विधानसभा निवडणुका झाल्यानंतर या निवडणुका घ्याव्यात, असे आधीच्या सरकारचे मत होते. आता राज्यात सत्ताबदल झाला आहे. भाजप-शिवेसनेची युती संपुष्टात आली आहे. राज्यस्तरावरील राजकीय समीकरणे बदलली आहेत. आता स्थानिक स्तरावरील निवडणुकांमध्येही त्यानुसारच राजकीय रणनीती आखली जात आहे.

७ जानेवारीला पाच जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत. त्यासंदर्भात शुक्रवारी प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला आमदार के.सी. पाडवी, पद्माकर वळवी, शोभा बच्छाव, कुणाल पाटील, तुकाराम रेंगे-पाटील, यांच्यासह जिल्हा निरीक्षक, जिल्हा प्रभारी व संबंधित जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष उपस्थित होते.

‘स्थानिक पदाधिकाऱ्यांना सर्वाधिकार’

या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये मित्रपक्षांशी आघाडी करण्याचे अधिकार स्थानिक पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली. ज्या ठिकाणी आवश्यक असेल तेथे शिवसेनेला सोबत घेऊन या निवडणुका लढल्या जातील, असे त्यांनी सांगितले. पाचही जिल्हा परिषदा निवडणुकांमध्ये काँग्रेस आघाडीचा विजय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2019 2:38 am

Web Title: congress to alliance with shiv sena for maharashtra zp polls zws 70
Next Stories
1 ठाण्यातील १८ प्रकल्पांसाठी वृक्ष हटवण्यास दिलेली परवानगी योग्य की अयोग्य?
2 मुंबई विद्यापीठाचा बृहत आराखडा प्रसिद्ध करताना नियमांचे उल्लंघन
3 ‘बुद्रुकवाडीचा मारुती बाटला’ महाअंतिम फेरीत
Just Now!
X