विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधात मांडण्यात आलेला अविश्वासाच्या ठरावावर चर्चा किंवा मतदान टाळावे म्हणून काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादीकडे विनंती करण्यात आली आहे. या संदर्भात प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगण्यात येते.
विधान परिषदेत राष्ट्रवादीचे २७ तर काँग्रेसचे २० आमदार असल्याने राष्ट्रवादीने सभापतींच्या विरोधात मांडलेला अविश्वासाचा ठराव मंजूर होऊ शकतो. सत्ताधारी भाजप यासाठी राष्ट्रवादीला मदत करण्याची शक्यता आहे. काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीचा सभापती भाजपसाठी केव्हाही सोयीचा ठरणार आहे. राष्ट्रवादीने हिवाळी अधिवेशनात अविश्वाचा ठराव मांडला असून, हा ठराव सोमवारपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चेला येईल. राष्ट्रवादीने अद्याप ठरावाबाबत कोणताही निर्णय घेतलेला नसून, अधिवेशन सुरू झाल्यावर एक-दोन दिवसात पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीत चर्चा केली जाईल, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले.
देशमुख यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याच्या विरोधातील अविश्वासाच्या ठरावावर राष्ट्रवादीने आस्ते कदम घ्यावे, असा काँग्रेसचा प्रयत्न आहे. अशोक चव्हाण यांनी राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाचे नेते अजित पवार यांच्याशी या संदर्भात चर्चा केली आहे. जरूर पडल्यास शरद पवार यांची भेट घेण्याची तयारी चव्हाण यांनी दर्शविली आहे. तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू असून, राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा करणार असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले.
राजीनाम्याचा पर्याय
शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधातील अविश्वासाच्या ठरावावर मतदान किंवा चर्चा केली जाणार नाही. पण देशमुख यांनी स्वत:हून सभापतीपदाचा राजीनामा द्यावा, असा पर्याय राष्ट्रवादीने मांडल्याचे कळते. कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसकडील हे पद काढून घेण्यावर अजित पवार ठाम आहेत.