लॉकडानमुळे बंद असलेली लोकल सेवा महिलांसाठी सुरु करण्यात आली असली तरी इतर प्रवाशांसाठी मात्र अद्याप बंदच आहे. मात्र महिला आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांपुरती मर्यादित असलेली रेल्वे प्रवास सुविधा लवकरच सर्वसामान्यांनाही मिळण्याचे संकेत आहेत. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दोन ते तीन दिवसांत यासंबंधी निर्णय घेतला जाईल अशी माहिती एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.

सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु करण्यासंबंधी रेल्वे आणि राज्य सरकार यांच्यात आज बैठक पार पडली. विजय वडेट्टीवार यांनी बैठकीनंतर बोलताना सांगितलं की, “हा निर्णय लवकरच होणार आहे. मुंबईकरांना फार काळ वाट पहायची गरज नाही. पुढच्या दोन ते तीन दिवसांत यावर नक्की शिक्कामोर्तब होईल”.

पुढे ते म्हणाले की, “आम्ही सर्व संघटनांना विश्वासात घेऊन, त्यांच्या कामाच्या वेळाही लक्षात घेणार आहोत. हॉटेल इंडस्ट्री पहाटे लवकर सुरु होते आणि रात्री ११.३० पर्यंत चालते. त्यांना कोणता वेळ द्यायचा वैगेरे तसंच असंघटित क्षेत्रातील सर्व लोकांसाठी वेळापत्रक पाहून, गाड्यांची संख्या वाढवून मार्ग काढण्याचं ठरलं आहे. यामधून नक्की दिलासा मिळेल”.

महिला विशेष रेल्वेफेऱ्यांमध्ये वाढ
सर्वच महिलांना रेल्वेप्रवासाची परवानगी दिल्यानंतर पश्चिम रेल्वेने महिला विशेष रेल्वे फेऱ्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला. याआधी दोन महिला विशेष रेल्वे फेऱ्या सुरू होत्या. बुधवारपासून आणखी चार महिला विशेष रेल्वे फेऱ्यांची भर पडली. विरार येथून सकाळी ८.५५ वाजता, त्यानंतर सकाळी ९.४९ वाजता रेल्वे चर्चगेटसाठी सुटेल. चर्चगेट येथून सायंकाळी ६.५५ वाजता आणि रात्री ७.४० वाजता विरारसाठी रेल्वे सुटणार आहे. या फे ऱ्यांमुळे पश्चिम रेल्वेवरील फे ऱ्यांची एकू ण संख्या ७०० वरुन ७०४ होईल. मध्य रेल्वेवर सध्या सीएसएमटी ते कल्याण आणि पनवेल मार्गावर चार महिला विशेष रेल्वेगाडय़ा धावतात.

वेळमर्यादा अशी..
सकाळी ११ ते दुपारी ३ आणि सायंकाळी ७ नंतर शेवटची उपनगरी रेल्वे सुटेपर्यंत सर्वच महिलांना रेल्वे प्रवासाची मुभा असेल. या दरम्यान प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांचे फक्त तिकीट ग्राह्य़ धरले जाईल. त्यांना क्यूआर कोड ई-पासची गरज नसेल, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.