प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे संकेत

मुंबई : येत्या सोमवारी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद आणि चांगली खाती मिळावीत, अशी भूमिका प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मांडली. उपमुख्यमंत्रिपद मिळावे ही पक्षाची मागणी असल्याचे संकेत त्यांनी दिले.

सरकारमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक पक्षाला चांगल्या खात्यांची अपेक्षा असते. ही अपेक्षा करणेही चूक नाही. काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना चांगली खाती मिळावीत, असे वाटते. आगामी विस्तारासाठी काँग्रेसच्या मंत्र्यांची नावे निश्चित केली आहेत. काँग्रेसमुळे मंत्रिमंडळाचा विस्तार लांबला, असा टोला राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी हाणला असला तरी हा दावा थोरात यांनी पत्रकार परिषदेत फेटाळला. या वेळी पक्षाचे नेते मोहन जोशी, डॉ. राजू वाघमारे आदी उपस्थित होते.

शरद पवार यांच्याकडे महाविकास आघाडीचा ‘रिमोट’ असल्याची चर्चा होते याकडे लक्ष वेधले असता, आघाडी सरकारमध्ये प्रत्येक पक्षाला आपली मते मांडण्याचा अधिकार असतो, असे सांगत पवारांचा कोणताही रिमोट नसल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्रिमंडळाचा विस्तार प्रशासनाच्या विनंतीमुळेच पुढे ढकलावा लागला. गेल्या शनिवारी नागपूरमधील हिवाळी अधिवेशन संपले. अधिकारी रविवारी मध्यरात्री किंवा सोमवारी मुंबईत पोहोचले. शपथविधीची तयारी करण्यास किमान ४८ तास तरी लागतात. या साऱ्या अडचणी लक्षात घेऊनच विस्तार लांबणीवर टाकण्यात आल्याचे थोरात यांनी सांगितले.

मंत्रिमंडळ विस्तारासाठी इतिहासात प्रथमच इतका वेळ – फडणवीस

बदलापूर : राज्याच्या इतिहासात  मंत्रिमंडळ विस्तारासाठी कधीही इतका वेळ लागला नव्हता, असा टोला  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला लगावला. विरोधाभासातून एकत्र येऊन सत्ता मिळवलीच आहे, तर सरकार व्यवस्थित तरी चालवा आणि किमान मंत्री मंडळाचा विस्तार तरी करा, असा सल्लाही फडणवीस यांनी दिला. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी आदर्श विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित केलेल्या ‘अटलसंध्या’ कार्यक्रमासाठी फडणवीस प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. हे सरकार चालवण्यासाठी आता मुख्यमंत्र्यांना कसरत करावी लागणार आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.