आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आघाडीत गेल्या वेळी लढलेल्या २२ मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीने नियोजन सुरू केले असले तरी राष्ट्रवादीच्या ताब्यातील काही मतदारसंघ मिळावेत, अशी काँग्रेसची भूमिका आहे. राष्ट्रवादीने लोकसभेची तयारी सुरू करताना काँग्रेसबरोबर आघाडीत गेल्या वेळी लढलेल्या २२ मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले आहे. आघाडीबाबत काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या पातळीवर निर्णय झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानुसारच राष्ट्रवादीने गेल्या वेळी लढलेल्या २२ जागा मिळतील हे गृहित धरून नियोजन सुरू केले. तरीही राष्ट्रवादीच्या ताब्यातील काही मतदारसंघ मिळावेत, अशी काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांची अपेक्षा आहे. कोल्हापूरमध्ये गेल्या वेळी अपक्ष लढलेले सदाशिव मंडलिक हे विजयी झाले होते. मंडलिक हे काँग्रेसबरोबर असल्याने या जागेवर काँग्रेसचा डोळा आहे. राष्ट्रवादीच्या बैठकीत कोल्हापूरच्या स्थानिक नेत्यांनी काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष वेधले असता शरद पवार यांनी कोल्हापूर मतदारसंघ हा राष्ट्रवादीकडेच राहिल, असे स्पष्ट केले होते.  त्यावर कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादीकडे योग्य उमेदवार नाही, असा काँग्रेसचा युक्तिवाद आहे.
विदर्भातील बुलढाणा हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असला तरी या जिल्ह्य़ात राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसची ताकद जास्त आहे. अमरावती जिल्ह्य़ातील सातपैकी चार आमदार काँग्रेसचे असल्याने या मतदारसंघावर काँग्रेसचा दावा आहे. हिंगोली मतदारसंघही मिळावा, अशी काँग्रेसची भूमिका आहे. या बदल्यात काँग्रेसने त्यांच्या ताब्यातील काही मतदारसंघ राष्ट्रवादीला देण्याची तयारी दर्शविली आहे.
गेल्या वेळी काँग्रेसने लढविलेल्या २६ पैकी १७ जागा जिंकल्या होत्या. कोल्हापूरचे मंडिलक आणि पालघरचे बाळाराम जाधव हे दोघे अपक्ष म्हणून निवडून आलेले खासदार काँग्रेसबरोबर असल्याने काँग्रेसकडे जागांची आदलाबदल करण्याकरिता सात मतदारसंघच शिल्लक आहेत. याउलट राष्ट्रवादीचे २२ पैकी आठ उमेदवार निवडून आल्याने आदलाबदल करण्याकरिता १४ मतदारसंघ आहेत, याकडे काँग्रेसचे नेते लक्ष वेधत आहेत.

काँग्रेसचे राज्यातील नेते अनभिज्ञ
आघाडी कायम ठेवतानाच राष्ट्रवादीने २२ मतदारसंघांची तयारी सुरू केली असली तरी काँग्रेसचे प्रदेश पातळीवरील नेते दिल्लीत काही निर्णय झाला असल्यास अनभिज्ञ आहेत. कारण पक्षश्रेष्ठींकडून राष्ट्रवादीबरोबरील आघाडीबाबत अद्याप काहीच सूचना देण्यात आलेल्या नाहीत, असे काँग्रेसचे प्रांताध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीच्या ताब्यातील काही मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात आले तर निवडून येऊ शकतात, असे सूचक विधान ठाकरे यांनी केले.