गोयल यांच्या पुस्तकाचा निषेध

मुंबई :  छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणारे भाजप कार्यकर्ते जय भगवान गोयल व त्यांच्या पक्षाविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने उद्या मंगळवारी राज्यभर आंदोलन केले जाणार आहे, अशी घोषणा प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी केली. मुंबईतील आंदोलनात आपण सहभागी होणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान आहेत. छत्रपतींच्या नावाने मते मागून सत्तेवर आलेल्या भाजपकडून शिवाजी महाराजांशी नरेंद्र मोदींची तुलना करण्याचा खोडसाळपणा सुरू आहे. ‘आजके शिवाजी : नरेंद्र मोदी’ या पुस्तकातून छत्रपतींचा अवमान केला आहे. शिवरायांचा वारंवार अवमान करणाऱ्या भाजपविरोधात मंगळवारी राज्यभर आंदोलन करुन तीव्र निषेध केला जाणार आहे, अशी  माहिती त्यांनी दिली.

थोरात म्हणाले की, व्यक्तिगत राजकीय स्वार्थासाठी नागरिकत्व कायदा व नागरिक नोंदणी कायद्याच्या माध्यमातून देशाला वेठीस धरणारे, धार्मिक तेढ निर्माण होईल अशी भूमिका घेणारे, नोटाबंदीच्या माध्यमातून सामान्य जनतेला वेठीस धरणारे आणि महत्त्वाचे म्हणजे हुकूमशाही पद्धतीने कारभार करू इच्छिणाऱ्या नरेंद्र मोदींची कोणत्याच अर्थाने छत्रपती शिवरायांसोबत तुलना होऊ  शकत नाही.

शिवस्मारकातही घोटाळा करणाऱ्या भाजपला खरेतर छत्रपती शिवाजी महाराजांचे नावही घेण्याचा नैतिक अधिकार नाही. भाजपच्या या खोडसाळपणाचा काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यभर निषेध केला जाणार आहे. मुंबई येथे भाजपविरोधात आपण कार्यकर्त्यांसह आंदोलन करणार असून राज्यातील सर्वच काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते जिल्हा व तालुकास्तरावर तीव्र आंदोलन करतील, असे थोरात यांनी सांगितले.

महाराष्ट्रात विरोध – गायकवाड

‘मोदींचे पुस्तक महाराष्ट्रात येऊ  देणार नाही’ असा इशारा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी सोमवारी आझाद मैदान येथील राजीव गांधी भवनाबाहेर झालेल्या आंदोलनात दिला. याच घटनेच्या निषेधार्थ मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी सोमवारी आझाद मैदान परिसरातील महापालिका मुख्यालय मार्गावरील मुंबई काँग्रेस कार्यालयाबाहेर आंदोलन केले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी लेखक जय भगवान गोयल यांच्या प्रतिमेचे दहन करून घोषणाबाजी केली.

‘आर्थिक मंदी, बेरोजगारीसारख्या मूलभूत प्रश्नांवरून सर्वसामान्य जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच भाजप सरकार अशा गोष्टी करत आहे. काही दिवसांपूर्वी भाजपप्रेमींना नरेंद्र मोदी भगवान विष्णूंचा अवतार असल्याचाही साक्षात्कार झाला होता. या पुस्तकातून शिवरायांशी केलेली तुलना हा छत्रपती शिवरायांचा अपमान असल्याने हे पुस्तक आम्ही महाराष्ट्रात येऊ  देणार नाही.  भाजपने या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालून पुस्तकावर कायमची बंदी आणावी.’ असे सांगत गायकवाड यांनी लेखकाच्या अटकेची केली.

पुस्तकाशी संबंध नाही – भाजप

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करणाऱ्या पुस्तकावरून निर्माण झालेल्या वादापासून सोमवारी भाजपने हात झटकले आहेत. पुस्तकामध्ये लेखकाची वैयक्तिक मते असून भाजपचा त्या पुस्तकाच्या प्रकाशनाची काहीही संबंध नाही, असेही स्पष्ट केले आहे.

‘आज के शिवाजी : नरेंद्र मोदी’ हे पुस्तक वादग्रस्त ठरले आहे. या पुस्तकाचे लेखक जयभगवान गोयल हे भाजपचे सदस्य असून त्यांनीही पुस्तकातील वादग्रस्त भाग वगळण्याची इच्छा व्यक्त केली आहे, असे भाजपचे माध्यम सहप्रभारी संजय मायुख यांनी येथे सांगितले.  मोदी यांनी शिवाजी महाराजांप्रमाणे प्रत्येकाला बरोबर घेऊन जाण्यासाठी काम केले आणि अनेकांना जे अशक्य वाटत होते ते शक्य करून दाखविले इतकेच आपल्याला वाचकांना सांगण्याची इच्छा होती, असेही गोयल यांनी म्हटले आहे.

मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसच्या सेवा दलाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पुस्तकात सावरकरांबद्दल आक्षेपार्ह लेखन प्रसिद्ध झाले आहे, त्या वेळी शिवसेनेपासून राष्ट्रवादी आणि काँग्रेसने मौन का बाळगले? या पक्षांनी आघाडी करताना त्यातील ‘शिव’ शब्द सुद्धा काढून टाकला. या पक्षांचे शिवाजी महाराजांबद्दलचे प्रेम हे त्यांच्या आघाडीचे नाव ठेवतानाच दिसून आले.  –  चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष

छत्रपती शिवाजी महाराज आणि देशासाठी लढलेल्या स्वातंत्र्यसैनिकांशी कोणाचीही तुलना होऊ  शकत नाही. या पार्श्वभूमीवर ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी..’ हे पुस्तक म्हणजे कोणा तरी कार्यकर्त्यांचा खोडसाळपणा असू शकतो. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी लक्ष घालून हे वादग्रस्त पुस्तक मागे घ्यावे. –  शिवेंद्रसिंहराजे भोसले, भाजप आमदार, सातारा

राज्यात या पुस्तकाचे वितरण करु दिले जाणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची इतरांशी तुलना करुन त्यांचा अपमान करणे सहन करता येणार नाही.  – संजय राऊत, शिवसेना नेते