भंडारा मतदारसंघ चर्चेसाठी खुला

लोकसभेच्या पालघर मतदारसंघातील  आणि विधानसभेच्या पलूस मतदारसंघातील पोटनिवडणूक लढविण्याचे काँग्रेसने ठरविले आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातही पोटनिवडणूक होत आहे. ही जागा काँग्रेसने लढवायची की राष्ट्रवादी काँग्रेसने, याबाबत चर्चा होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्रितपणे लढविण्याचा विचार काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरु आहे. त्याची सुरुवात लोकसभा व विधानसभेच्या पोटनिवडणुकीतून तसेच, विधान परिषद निवडणुकीपासून करावी, असे काँग्रेसचे मत आहे. परंतु, जागा वाटपावरुन दोन्ही पक्षात सध्या रस्सीखेच सुरु आहे.

पालघर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे खासदार चिंतामन वनगा यांचे निधन झाल्याने तेथे पोटनिवडणूक होत आहे. त्याचबरोबर भाजपचे उमेदवार म्हणून लोकसभेवर निवडून गेलेले नाना पटोले यांनी पक्षाचा आणि खासदारकीचा राजीनामा दिल्यामुळे  भंडारा-गोंदिया मतदारसंघातही पोटनिवडणूक होत आहे. माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पलूस-कडेगाव मतदारसंघातही पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.

पालघर व पलूस या दोन जागा काँग्रेस लढविणार आहे. नाना पटोले हे आपल्या मूळ पक्षात काँग्रेसमध्ये आले असले तरी, आघाडीच्या जागावाटपात भंडारा-गोंदिया ही जागा या पूर्वी राष्ट्रवादीला सोडण्यात आली होती.  त्यामुळे हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडायचा किंवा नाही, याबाबत काँग्रेसमधून स्पष्ट केले जात नाही, परंतु त्याबाबत चर्चा होऊ शकते, असे चव्हाण यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.

लातूर घ्या, परभणी द्या

विधान परिषदेच्या सहा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात निवडणुका होत आहेत. मात्र लातूर मतदारसंघावरुन दोन्ही काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरु आहे. लातूरचे विद्यमान आमदार दिलीप देशमुख काँग्रेसचे आहेत. त्यामुळी ही जागा काँग्रेस सोडणार नाही, अशी भूमिका पक्षाने घेतली आहे. तर पूर्वी ही राष्ट्रवादीचीच जागा होती, ती काँग्रेसला दिली होती, ती परत मिळावी, असा राष्ट्रवादीच्या नेत्यांचा आग्रह आहे. त्यावर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेली परभणीची जागा कॉंग्रेसकडे होती, पूर्वीच्या जागांचा विचार करायचा झाला तर मग लातूर घ्या आणि परभणी काँग्रेसला सोडा, असे अशोक चव्हाण यांचे म्हणणे आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या जागावाटपात पेच निर्माण झाला आहे.