गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत असल्याने काँग्रेसने निषेध व्यक्त केला असून सोमवारी राज्यभरात आंदोलन करणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ही माहिती दिली. अर्थव्यवस्थेला बळ देण्याऐवजी केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवत आहेत, या संदर्भात सोमवारी राज्यभर आंदोलन करणार आहोत अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणदेखील उपस्थित होते.

बाळासाहेब थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, “काँग्रेस २९ तारखेला पेट्रोल आणि डिझेलची जी भाववाढ चालली आहे त्याविरोधात एक तासाचं आंदोलन करणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर हे आंदोलन करण्यात येणार आहे. यासोबत केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींना निवेदन पाठवण्यात येणार आहे. इंधनाचे दर वाढत असल्याने अर्थ्यवस्थेला मोठा धक्का बसत आहे”.

आणखी वाचा- पेट्रोल-डिझेलची दरवाढ कायम; जाणून घ्या नवे दर

पृथ्वीराज चव्हाण यांनी लडाखच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारला घेरलं. “चीनची घुसखोरी आम्हाला कदापिही मान्य नाही. घुसखोरी रोखणं केंद्र सरकारचं कर्तव्य आहे. देशाच्या सुरक्षेसाठी घेतलेल्या निर्णयात कॉंग्रेसचा सरकारला पाठिंबा असेल,” असं यावेळी त्यांनी सांगितलं. पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या वक्तव्यावर टीका करताना मोदी यांनी चीनच्या कटकारस्थानाला बळ देऊ नये असं वक्तव्य केलं.

“नरेंद्र मोदींच्या वक्तव्याचा चीन गैरफायदा घेत असून वाटाघाटी करताना याचा प्रभाव पडणार आहे,” असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असं वक्तव्य का केलं ? याचं योग्य स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. त्यामागे काही धोरण होतं का?,” अशी विचारणा पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

आणखी वाचा- “मोदी चीनमध्ये फार लोकप्रिय झाले आहेत”, पृथ्वीराज चव्हाणांचा टोला

“चीनच्या राष्ट्राध्यक्षांसोबत मोदींचे चांगले संबंध असल्याचं सर्वांना माहिती आहे. त्यांना न दुखावण्याचा त्यामागे काही विचार होता का ? पण यामुळे वाटाघाटी करताना भारताची भूमिका दुबळी झाली आहे का ? याचं उत्तर मिळालं पाहिजे,” असं पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी म्हटलं.

“मोदींच्या वक्तव्याचे गंभीर परिणाम दिसत आहे. यामुळे चीनने भारताच्या पंतप्रधानांचं कौतुक केलं, आणि जगालाही आम्ही अतिक्रमण केलं नाही असं भारताचे पंतप्रधान सांगत असल्याचं दाखवत आहेत. मोदी चीनमध्ये फार लोकप्रिय झाले आहेत असंही समजत आहे,” असा टोला यावेळी त्यांनी लगावला.

“देशाच्या सुनिश्चिततेला धोका निर्माण झाल्यावर प्रश्न उपस्थित करणं आणि स्पष्टीकरण मागणं विरोधकांचं काम आहे. त्यांच्या प्रश्नांना उत्तर देणं सरकारची जबाबदारी आहे,” असं यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.