News Flash

सर्व मंत्र्यांचे समाधान करताना काँग्रेसची तारेवरची कसरत

ग्रामीण भागाशी संबंधित एखादे महत्त्वाते खाते मिळण्याची पक्षाची मागणीही मान्य होऊ शकली नाही.

(संग्रहित छायाचित्र)

पक्षाच्या वाटय़ाला केवळ १२ मंत्रिपदे आली आणि साऱ्यांचे समाधान करताना काँग्रेस नेतृत्वाला  तारेवरची कसरत करावी लागली. ग्रामीण भागाशी संबंधित एखादे महत्त्वाते खाते मिळण्याची पक्षाची मागणीही मान्य होऊ शकली नाही.

महसूल, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम, शालेय शिक्षण, वैद्यकीय शिक्षण, दुग्धविकास व पशुसंवर्धन, वस्त्रोद्योग, आदिवासी विकास अशी खाती काँग्रेसच्या वाटय़ाला आली. राष्ट्रवादी आणि शिवसेनेने आधीच महत्त्वाची खाती घेतल्याने काँग्रेसमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली. खातेवाटपाच्या चर्चेत अजित पवार आणि अशोक चव्हाण यांच्यात यावरूनच खडाजंगी झाली. पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव या वादाशी जोडण्याचा प्रयत्न झाला. मुख्यमंत्रिपद भूषविल्यावर अशोक चव्हाण यांनी साधे मंत्रिपद स्वीकारले. दुसरे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महत्त्वाचे खाते मिळणार नसल्याने बाहेर राहणेच पसंत केले.

प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी महसूल हे खाते स्वत:कडे ठेवले. पृथ्वीराज चव्हाण सरकारमध्ये त्यांनी महसूल खातेच भूषविले होते. अशोक चव्हाण यांना हे खाते हवे होते.  ऊर्जा खाते नितीन राऊत यांना मिळाले असले तरी सुनील केदार या खात्यासाठी आग्रही होते. विरोधी पक्षनेतेपद भूषविले असल्याने चांगले खाते मिळावे ही विजय वडेट्टीवार यांचीही इच्छा होती.

कॅबिनेट मंत्रिपद मिळाले नसले तरी बंटी पाटील यांच्याकडे गृहराज्यमंत्रिपदात शहर हा महत्त्वाचा भाग मिळाला.

पक्षाच्या वाटय़ाला मर्यादित मंत्रिपदे आली. विभागीय समतोल राखणे आवश्यक होते. यामुळे साऱ्यांचेच समाधान करणे शक्य झाले नाही. खातेवाटपात छोटय़ा-मोठय़ा कुरबुरी असल्या तरी सर्व जण कामाला लागतील आणि पक्ष वाढविण्याकरिता प्रयत्न करतील.

– बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री

महाविकास आघाडीत शिवसेनेचे ५६ तर राष्ट्रवादीचे ५४ आमदार आहेत. तुलनेत काँग्रेसचे आमदार कमी आहेत. आमदारांच्या संख्येच्या आधारेच मंत्र्यांची संख्या आणि खातेवाटप निश्चित झाले. तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या सहमतीने त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. यामुळे कोणाला जास्त तर कोणाला कमी मंत्रिपदे किंवा खाती मिळाली याची चर्चा आता निर्थक ठरते.

-प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 6, 2020 1:11 am

Web Title: congress workout while satisfying all ministers abn 97
Next Stories
1 महत्त्वाची खाती राष्ट्रवादीकडेच
2 ‘जितके अत्याचार, लढा तितकाच प्रखर’
3 पार्ले टिळक शाळेत ‘भाषाविश्व’ प्रदर्शन
Just Now!
X