26 February 2021

News Flash

रुग्णवाढीचा विषाणूच्या उत्परिवर्तनाशी संबंध नाही!

‘आयसीएमआर’कडून स्पष्ट

संग्रहीत

महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये वाढत असलेली रुग्णसंख्या आणि आढळलेले करोनाचे एन ४४०के आणि ई ४८क्यू हे उत्परिवर्तित विषाणू यांचा एकमेकांशी थेट कोणताही संबंध नाही, असे भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने (आयसीएमआर) पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

देशात आढळलेले एन ४४०के आणि ई ४८क्यू हे उत्परिवर्तित विषाणू खूप आधी सापडले आहेत. यातील ई ४८क्यू हा विषाणू महाराष्ट्रात मार्च ते जुलै २०२० या कालावधीत आढळला होता. तर एन ४४०के हा विषाणू तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि आसाम येथील १३ वेगवेगळ्या ठिकाणी मे ते सप्टेंबर २०२० या कालावधीत सापडला होता. हे दोन्ही विषाणू अन्य देशांमध्येही आढळले आहेत. त्यामुळे या विषाणूंच्या उत्परिवर्तनामुळे महाराष्ट्रातील रुग्णसंख्या वाढते असे म्हणता येणार नाही, असे महासंचालक डॉ. बालाराम भार्गव यांनी परिषदेत मांडले. वाढत्या रुग्णसंख्येवर बारकाईने लक्ष दिले जात असून तपास सुरू आहे, असेही आयसीएमआरने या वेळी सांगितले. राज्यात अद्याप परदेशातील कोणताही उत्परिवर्तित विषाणू न आढळल्याचे राज्याच्या आरोग्य विभागानेही गेल्या आठवडय़ात स्पष्ट केले होते. त्यानंतर आता आयसीएमआरनेही याला दुजोरा दिला आहे.

१०० नमुने चाचणीसाठी

अमरावती, यवतमाळ आणि नागपूरमधील एकूण ३०० नमुने जनुकीय क्रमनिर्धारण (जिनोम सिक्वेन्सिंग) चाचणीसाठी पाठविले असून आता मुंबईतीलही १०० नमुन्यांची चाचणी करण्यात येणार आहे.

मुंबईत ६४३ नवे रुग्ण

मुंबईत मंगळवारी ६४३ नवे रुग्ण आढळले असून ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णवाढीचा दर वाढून ०.२३ टक्क्यांवर गेला आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्याही वाढत असून सध्या ७ हजार ५३६ रुग्ण उपचाराधीन आहेत, त्यापैकी २७१ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. मुंबईत एकूण बाधितांची संख्या तीन लाख २० हजार ५३१ झाली आहे. तर एका दिवसात ५०१ रुग्ण बरे झाले, त्यामुळे आतापर्यंत ३ लाख ६८१ म्हणजेच ९४ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.  तर मृतांची एकूण संख्या ११,४४९ वर गेली आहे. मुंबईतील चाचण्यांचे प्रमाणही वाढवण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2021 12:19 am

Web Title: connection of the new corona with the outbreak in maharashtra kerala is unclear abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 अ‍ॅपमधील त्रुटी अन् वेळेचे निर्बंध यामुळे लसीकरण संथगतीने
2 मंत्रालयाचे कामकाज दोन सत्रांत
3 बुलेट ट्रेनसाठी २२ हजार खारफुटी तोडणार
Just Now!
X