News Flash

उत्सव चैतन्य!

ग्राहकांचा प्रतिसाद पाहून अनेक विक्रेत्यांनी वस्तूंची चढय़ा भावात विक्री

छाया : गणेश शिर्सेकर

टाळेबंदीमुळे गेल्या चार-पाच महिन्यांपासून शुकशुकाट दिसणाऱ्या राज्यातील सर्व बाजारपेठांमध्ये शुक्रवारी उत्सव चैतन्य संचारले.

सकाळपासून कोसळणाऱ्या पावसाच्या सरी, गर्दीमुळे वाढणारी करोना संसर्गाची भीती या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करीत मुंबई आणि उपनगरांतील नागरिक गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी घराबाहेर पडले. मुंबईत दादर, लालबाग, क्रॉफर्ड मार्केटसारख्या मुख्य बाजारपेठा अनेक महिन्यांनंतर फुलल्या. मुंबईबरोबरच ठाणे, डोंबिवली, विरारहून लोक खरेदीकरिता येथे आले होते. पूजा साहित्य आणि फुलांच्या बाजारातही गर्दी पाहायला मिळाली. तसेच मिठाईला कित्येक दिवसांनी मागणी वाढली.

खरेदीसाठी अनेक जण वैयक्तिक वाहन घेऊन आल्याने सर्वच बाजार परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली. तरी बऱ्याच दिवसांनी या परिसरांत अभूतपूर्व उत्साह दिसून आला. ग्राहकांचा प्रतिसाद पाहून अनेक विक्रेत्यांनी वस्तूंची चढय़ा भावात विक्री केली.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी रेल्वे प्रवासाचा फायदा घेत दादर गाठले. ‘वर्षांतून येणारा सण असल्याने काहीही कमी पडता कामा नये. केवडा, सुपारी आणि काही पारंपरिक वस्तू दादरमध्येच विक्रीसाठी येतात त्यामुळे खरेदीसाठी इथेच यावे लागले,’ असे पालिका कर्मचारी असलेल्या मुलुंडच्या भामिनी भोईर यांनी सांगितले. तर अंधेरीचे अरविंद वाघ दरवर्षी मखर, कंठी आणि इतर साहित्य घेण्यासाठी दादरमध्येच येतात. याहीवर्षी दुचाकीवरून ते दादरमध्ये खास खरेदीसाठी आले.

हलवायांच्या चेहऱ्यावर गोडवा

ठप्प असलेल्या मिठाईविक्री व्यवसायाला गणेशोत्सवामुळे उभारी आली. उकडीच्या मोदकांसह, मावा, केसरी, काजू, स्ट्रॉबेरी, चॉकलेट, गुलकंद, बटरस्कॉच, मँगो असे नाना प्रकारचे मोदक बाजारात आहेत. दरवर्षीएवढी नसली तरी मिठाई, पेढे यांना शुक्रवारी चांगली मागणी होती. ‘नेहमीच्या ग्राहकांना त्यांच्या आवडीचे मोदक मिळावेत यासाठी सर्व प्रकार ठेवले आहेत. चार दिवस २५ टक्केही विक्री नव्हती, मात्र दोन दिवसांत मिठाई खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या ५० टक्के झाली आहे. रक्षाबंधनप्रमाणे हा सणही चांगला जाईल,’ असा विश्वास चांदेरकर स्वीट्सचे राजेंद्र खामकर यांनी व्यक्त केला. ‘दुकानात चार प्रकारचे मोदक ठेवले आहेत. पूर्वी आठ प्रकारचे मोदक विक्रीला असत. मंडळे आणि नागरिकांकडून मागणी येण्याची शक्यता नसल्याने १० ते १५ किलो वजनाचे मोदक बनवले नाहीत. सध्या ३० टक्के विक्री होत आहे, असे कांदिवलीतील ‘जैन स्वीट्स’चे मालक प्रदीप जैन यांनी सांगितले. विलगीकरणाच्या नियमामुळे कोकणातील गणेशभक्त १४ दिवस आधीच गावी गेल्याने मिठाई विक्रीला फटका बसला, अशी माहिती दादरच्या चंदु हलवाई दुकानाचे सुजीत ठाकूर यांनी दिली.

फुलांचे दर चढेच

मागणी मर्यादित असली तरी सलग दोन दिवस सर्व फुलांचे दर चढे राहिले. शुक्रवारी सकाळी किरकोळ बाजारात झेंडूचा भाव २०० ते २५० रुपये किलोपर्यंत होता, तो दुपारनंतर ३०० रुपयांपर्यंत गेला. गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी जास्वंद, दूर्वा, बेल, मोगरा यांचे दर दुप्पट झाले. किरकोळ बाजारात झेंडूची फुले ३०० रुपये किलो इतक्या चढय़ा दराने विकली जात असताना घाऊक बाजारात मात्र किलोचा दर १०० ते १५० रुपये आहे. गुरुवारपेक्षा शुक्रवारी फुलांची आवक केवळ १० टक्क्यांनी वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

१ दिवसभर पावसाची रिपरिप असतानाही गर्दी कमी झाली नाही. मुखपट्टी, हातात छत्री, खरेदीच्या पिशव्या, अंगावर रेनकोट अशी कसरत करत लोक खरेदी करत होते.

२ संध्याकाळी चारच्या सुमारास कामावरून घरी परतणारे नागरिकही यात सामील झाल्याने सायंकाळी दादरच्या फु लबाजारात पाय ठेवायलाही जागा नव्हती.

* दोन दिवसांपूर्वी पन्नास रुपयांना मिळणारी पाच फळे शुक्र वारी दीडशे रुपयांना विकली जात होती.

*पंधरा रुपयांच्या लहान आकाराच्या नारळासाठी तब्बल तीस ते पस्तीस रुपये मोजावे लागत होते.

* आंब्याची डहाळी ३०, केवडय़ाचे पान ७०, दूर्वा जुडी ५०, तुळस १००, जास्वंद प्रतिनग १० अशा चढय़ा कि मतीत वस्तूंची विक्री होत होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 22, 2020 12:33 am

Web Title: consciousness in all the markets in the state abn 97
टॅग : Ganeshotsav
Next Stories
1 ‘सेलिब्रिटींचा बाप्पा’मधून तारांकितांचे गणपती दर्शन
2 वाढीव वीजदेयकात सवलतीचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर
3 मुंबईत पुन्हा करोना रुग्णसंख्येत वाढ
Just Now!
X