गेले अडीच महिने थंड असलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या बाजारपेठेत टाळेबंदी शिथिलीकरणामुळे चैतन्य आले आहे. बाजारपेठ उघडताच इलेक्ट्रॉनिक दुकानांबाहेर शुक्रवारी खरेदीसाठी रांगा लागल्याचे चित्र होते. विद्यार्थी, शिक्षक आणि घरून काम करणारे लॅपटॉप, मोबाइलसाठी तर महिला गृहोपयोगी उपकरणांसाठी रांगेत उभ्या होत्या.

बंद पडलेल्या घरगुती उपकरणांमुळे वैतागलेले लोक आणि घरातून काम करणाऱ्यांची इलेक्ट्रॉनिक बाजारपेठेत गर्दी होत आहे. मोबाइल, लॅपटॉप, टॅब, मिक्सर, पाणी शुद्धीकरण यंत्र, व्हॅक्यूम क्लिनर आदी उपकरणांना अधिक मागणी आहे. शीव, दादर, प्रभादेवी, चेंबूर परिसरातील विजय सेल्स, क्रोमा, कोहिनूर, रिलायन्स डिजिटल अशा मोठय़ा दुकानांमध्ये एकावेळी ५० ते १०० लोक रांगेत उभे असल्याचे पाहायला मिळाले. ‘ इतर वेळी महिन्यात ५० ते ६० लॅपटॉपची विक्री होते, परंतु गेल्या पाच दिवसांत २०० हून अधिक लॅपटॉप विकले गेले आहेत’, अशी माहिती चेंबूरच्या कोहिनूर दुकानाचे व्यवस्थापक मनोज सिंग यांनी दिली.

करोना संसर्गाची भीती आणि पावसाळ्यात अशुद्ध पाण्याच्या धास्तीने जल शुद्धीकरण यंत्रांची मोठय़ा प्रमाणावर खरेदी होत असल्याचे ‘विजय सेल्स’चे व्यवस्थापक गिरीश माट यांनी सांगितले. लोक स्वच्छतेच्या बाबतीत जागृत झाल्याने शुद्धीकरण यंत्रांची मागणी वाढली. शिवाय शिक्षक, विद्यार्थी, पालक हा वर्ग सातत्याने लॅपटॉप, टॅबची विचारणा करत आहे. गेल्या काही दिवसांत या उपकरणांची विक्री दुपटीने वाढल्याचेही त्यांनी सांगितले. ‘शिक्षक मुलांना मोबाइल खरेदी करण्याबाबत रोज बजावत असतात. त्यात आमचीही कामे मोबाइलवरच सुरू असल्याने मुलांच्या अभ्यासाची हेळसांड होते, असे आपल्या दहावीतील मुलासाठी मोबाइल फोन खरेदी करायला आलेले सचिन भाट यांनी सांगितले.

काही तरुणांची अ‍ॅपलच्या महागडय़ा मोबाइल फोनना पसंती आहे, तर बहुसंख्य ग्राहक चिनी शाओमी कंपनीचे स्वस्त मोबाइल खरेदी करत आहेत. शीव येथील ‘क्रोमा’बाहेर दीडशे ग्राहकांची रांग होती. गेल्या काही दिवसांत विक्री वाढल्याने लॅपटॉप, मोबाइलचा मर्यादित साठा उरला असल्याचेही तेथील व्यवस्थापकांनी सांगितले.

अनेक महिला मिक्सर खरेदी करताना दिसल्या. ‘मिक्सर, इस्त्री, कपडे धुलाई यंत्र बंद पडल्याने दोन महिने दुकाने उघडण्याची वाट पाहावी लागली. तीन-चार दिवस गर्दी ओसरत नसल्याने शेवटी आम्हीही रांग लावून खरेदीसाठी आलो’, असे काही महिलांनी सांगितले.

ट्रिमर खरेदी जोरात

केशकर्तनालये अद्याप बंद आहेत. परंतु ती उघडली तरी तेथे केस, दाढी कापून घेणे अनेकांना जोखमीचे वाटत असल्यानेच इलेक्ट्रॉनिक रेझरची मोठय़ा प्रमाणावर खरेदी होत आहे. ‘केशकर्तनालये सुरू झाली तरी तेथे जाणे धोकादायक ठरू शकते,’ असे रेझर खरेदी करणाऱ्या एका तरुणाने सांगितले.