मुंबईत करोना रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होत आहे. मंगळवारचा अपवाद वगळता आज सलग दुसऱ्या दिवशी करोना रुग्णांच्या संख्येत एक हजारच्या पुढे वाढ नोंदवण्यात आली आहे. मुंबईत आज १,१४५ जणांचे करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. काल २४ फेब्रुवारी रोजी ११६७ नवे करोना रुग्ण आढळून आले होते. म्हणजे कालच्या तुलनेत आज किंचित रुग्णवाढ कमी आहे.

मुंबईत सध्या करोनाचे ८,९९७ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. करोनामुळे मुंबईत आज पाच रुग्णांचा मृत्यू झाला. ४६३ रुग्ण करोनामधुन बरे झाले. करोनामधुन रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४ टक्के आहे. मुंबईत आतापर्यंत ३ लाखाहून जास्त रुग्ण करोनामधुन बरे झाले आहेत. करोनामुळे रुग्ण दुप्पटीचा कालावधी २७३ दिवस झाला आहे. १८ ते २४ फेब्रुवारी दरम्यान करोना रुग्णवाढीचे प्रमाण ०.२५ टक्के आहे.

मागील दोन दिवसांपासून मुंबईतील रुग्णसंख्या कमी होत असताना बुधवारी अचानक ही संख्या जवळजवळ दुप्पटीने वाढली. मुंबईत मंगळवारी ६४३ नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती.

मुंबईत करोनाची लक्षणे नसलेले ८५ टक्के पॉझिटिव्ह रुग्ण
दरम्यान मुंबईत दररोज सापडणाऱ्यां पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ८० ते ८५ टक्के रुग्णांमध्ये करोनाची कुठलीही लक्षणे नाहीत. पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी ही माहिती दिली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. बुधवारी मुंबईत ११०० पेक्षा जास्त करोना रुग्ण सापडले पण त्यातल्या ८३ टक्के रुग्णांमध्ये करोनाची कुठलीही लक्षणे नव्हती असे चहल यांनी सांगितले.

लक्षणे नसलेल्या रुग्णांना दाखल करुन घेऊ नका, असे पालिका आयुक्तांनी खासगी रुग्णालयांना निर्देश दिले आहेत. महत्त्वाचं म्हणजे राज्यातील ७८ टक्के अ‍ॅक्टिव्ह रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल आहेत, तेच मुंबईत ४९ टक्के अ‍ॅक्टिव्ह रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत.