मुंबईमधील लोकसंख्या लक्षात घेऊन महापालिकेच्या शाळांमध्येही लसीकरण केंद्र सुरू करण्याचा विचार प्रशासन पातळीवर सुरू आहे. तथापि, शाळांमध्ये आवश्यक ती सर्वच वैद्यकीय यंत्रणा उभारावी लागणार आहे. त्यामुळे अखेरच्या टप्प्यात गरज भासली तरच पालिका शाळांध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्याचा विचार आहे.

प्रशासनाने सुरुवातीला आठ रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्रांची उभारणी करण्याची घोषणा केली होती. या आठ केंद्रांमध्ये प्रतिदिन १२ हजार जणांना करोनाची लस देण्याचे नियोजन होते. त्यानंतर पालिका रुग्णालये, सलग्न रुग्णालये, दवाखाने, जम्बो करोना केंद्र आदी ७५ ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्याचे प्रशासनाने निश्चित केले. त्या दृष्टीने आखणी सुरू केली असून या केंद्रांमध्ये प्रतिदिन ५० हजार नागरिकांना लस देणे शक्य होणार आहे.

मुंबईतील लोकसंख्येने दीड कोटीचा आकडा पार केला आहे. उपलब्ध होणारी लस कमी काळात अधिकाधिक व्यक्तींना देण्याचा मानस आहे. त्यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात येत आहे.

शाळांमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी उपलब्ध कराव्या लागतील. लस दिल्यानंतर काही काळ संबंधित व्यक्तीला तेथेच बसवून ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी शाळांमध्ये मुबलक जागा मिळू शकते. मात्र लस दिल्यानंतर त्रास झालाच तर संबंधितांवर वैद्यकीय उपचार करण्यासाठी आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवावी लागेल. यासाठी मोठा खर्चही येईल. त्यामुळे अगदीच गरज भासल्यास शाळांमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यात येईल, असे या अधिकाऱ्यांनी सांगितले.