पावसाळ्यात बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ओसंडून वाहणाऱ्या विहार तलावातील पाण्यामुळे मिठी नदीला पूर येत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्यावर तोडगा म्हणून विहार तलावातील पाणी भांडुप जलशुद्धीकरण केंद्र आणि ऐरोली येथील खाडीत सोडण्याबाबत अभ्यास करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. विहारमधील पाणी अन्यत्र वळविण्यात यश आल्यास मिठीला येणाऱ्या पुराचा धोका भविष्यात टळू शकेल, असा आशावाद पालिका अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

मुंबईमध्ये मिठी, दहिसर, पोयसर, ओशिवरा आदी नद्या असून विविध भागांतील छोटे-मोठे नाले या नद्यांना येऊन मिळतात. मुसळधार पाऊस पडल्यानंतर या नद्यांतील पाण्याची पातळी वाढते आणि नद्यांच्या किनाऱ्यांवर उभ्या असलेल्या वस्त्यांतील रहिवाशांना फटका बसतो. मुंबईमध्ये २६ जुलै २००५ मध्ये कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे हाहाकार उडाला होता.

मुंबईतील पूरस्थितीला कारणीभूत ठरलेल्या मिठी नदीचा अभ्यास करण्यात आला. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील विहार धरण ओसंडून वाहू लागल्यानंतर ते पाणी मिठी नदीत जाते. त्यामुळे मिठी नदी दुथडी भरून वाहू लागते. परिणामी, काठावरच्या वस्त्या जलमय होतात.

ब्रिमस्टोवॅड प्रकल्पाअंतर्गत मिठी नदीचे खोलीकरण आणि रुंदीकरणाचे काम पालिकेने हाती घेतले होते. बहुतांश ही कामे पूर्णही झाली आहेत. मात्र अद्यापही मिठीला येणाऱ्या पुराचा प्रश्न सुटू शकलेला नाही. ही बाब लक्षात घेऊन विहार तलावातील पाणी अन्यत्र वळविण्याबाबत अभ्यास करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात दोन कोटी ६९ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या कामासाठी निविदा प्रक्रियाही राबविण्यात आली होती. मात्र करोनामुळे निर्माण परिस्थितीत हे काम सुरू होऊ शकलेले नाही.

भातसा, अप्पर वैतरणाही ओसंडून वाहण्याच्या मार्गावर

मुंबई : मुंबईकरांची तहान भागविणारा भातसा आणि उध्र्व वैतरणाही ओसंडून वाहण्याच्या मार्गावर आहेत. ओसंडून वाहण्यासाठी अप्पर वैतरणा आणि भातसामध्ये अनुक्रमे ०.६१ मीटर व ०.७७ मीटर इतकी जागा शिल्लक आहे. सध्या या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस पडत आहे.

मुंबईकरांना उध्र्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशीमधून दररोज ३७५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. जून, जुलैमध्ये पावसाने ओढ घेतल्यामुळे मुंबईत २० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली होती; परंतु तलाव भरू लागल्यानंतर यापैकी १० टक्के पाणीकपात मागे घेण्यात आली होती. गेले काही दिवस पडणाऱ्या दमदार पावसामुळे तुळशी, विहार, मोडकसागर आणि तानसा यापूर्वीच ओसंडून वाहू लागले आहेत. मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव ९६.५१ टक्के भरल्यामुळे मुंबईत लागू असलेली उर्वरित १० टक्के पाणीकपातही मागे घेण्यात आली आहे. आता येत्या एक-दोन दिवसांमध्ये अप्पर वैतरणा आणि भातसा ओसंडून वाहण्याच्या मार्गावर आहेत.

उर्ध्व वैतरणा आणि भातसाची पाणी पूर्ण भरण्याची क्षमता अनुक्रमे ६०३.५१ मीटर व १४२.०७ इतकी आहे. आजघडीला या तलावांमधील पाणी पातळी अनुक्रमे ६०२.९० मीटर व १४१.३० मीटर इतकी आहे.