उमाकांत देशपांडे

करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुन्हा काही निर्बंध लागू करण्यासाठी राज्य सरकार गंभीरपणे विचार करीत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत लवकरच बैठक होणार असून त्यात निर्णय घेतला जाईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने उपनगरी रेल्वेसेवा सर्वासाठी सुरू करण्याचा राज्य सरकारचा सध्या कोणताही विचार नाही. राज्यात दिवाळी खरेदीसाठी व अन्य वेळीही बाजारपेठांमध्ये उसळत असलेली गर्दी, चौपाटय़ा, समुद्रकिनारे व अन्य पर्यटनस्थळी, सार्वजनिक ठिकाणी होत असलेली गर्दी यामुळे करोना प्रसार वाढत आहे.

शाळा- महाविद्यालयांमध्ये करोना प्रतिबंधासाठी आणखी उपाययोजना करणे, पर्यटन व सार्वजनिक ठिकाणी कोणतेही नियम न पाळता विनाकारण फिरणाऱ्यांना प्रतिबंध करणे, सार्वजनिक ठिकाणी अनिर्बंध किंवा मुक्त वावर नियंत्रित करणे, विवाह व अन्य समारंभांसाठी पुन्हा २०० वरून ५० नागरिकांनाच हजर राहण्याची मुभा देणे, मुखपट्टी न वापरणाऱ्यांना दिल्लीच्या धर्तीवर अधिक दंड आकारणी करणे, अशा अनेक बाबींवर मुख्यमंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांबरोबरच्या बैठकीत चर्चा होऊन निर्णय होईल, अशी माहिती टोपे यांनी दिली.

मुंबईत दिवसभरात १,१३५ रुग्ण

* करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेत मुंबई महापालिकेने पुन्हा एकदा कंबर कसली असून, संसर्ग रोखण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना करण्यात येत आहे.

* असे असले तरी गेल्या काही दिवसांपासून करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. रविवारी १,१३५ जणांना करोनाची बाधा झाली, तर १९ जणांचा मृत्यू झाला.

* मुंबईमधील करोनाबाधित रुग्णांची संख्या आजघडीला दोन लाख ७५ हजार ७०७ वर पोहोचली आहे. विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेले ६१८ रुग्ण करोनामुक्त झाले असून, त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले. रुग्ण करोनामुक्त होण्याचे प्रमाण ९२ टक्क्यांवर स्थिरावले असून आतापर्यंत दोन लाख ५२ हजार १२७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

* रविवारी मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये १२ पुरुष, तर सात महिलांचा समावेश आहे. आतापर्यंत १० हजार ६७३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

* करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेऊन पालिकेने करोना चाचण्यांचे प्रमाण वाढविले आहे. मंडया, बाजारपेठांमधील विक्रेते, फेरीवाले, परप्रांतातून वा महाराष्ट्राच्या अन्य भागांतून येणाऱ्यांच्या चाचण्या करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत १७ लाख ७३ हजार ९८९ चाचण्या करण्यात आल्या आहेत.