21 September 2020

News Flash

आयुक्त बंगल्याच्या दुरुस्तीवर ४० लाख खर्च करण्याचा घाट

पालिकेचे उत्पन्न घटल्याने विरोधकांचा आक्षेप

संग्रहित छायाचित्र

मुंबईत करोनाविरोधात सुरू असलेल्या लढाईसाठी आलेला मोठा खर्च, तर दुसरीकडे पहिल्या तिमाहीत मुंबई महापालिकेचे घसरलेले उत्पन्न, अशी स्थिती असतानाही पेडर रोड परिसरातील मुंबई महापालिका आयुक्तांच्या बंगल्याची  ४० लाख रुपये खर्च करून डागडुजी करण्याचा घाट घालण्यात आला आहे. अंतर्गत दुरुस्तीबरोबरच सजावटीच्या वस्तू, फर्निचर आदी महागडय़ा साहित्याचाही त्यात समावेश आहे.

राज्य सरकारने टप्प्याटप्प्याने टाळेबंदी शिथिल करण्यास सुरुवात केली असली तरी एकूणच आर्थिक स्थितीवर परिणाम झाला आहे. चालू आर्थिक वर्षांत पालिकेला २८,४४८.३० कोटी रुपये उत्पन्न मिळेल असा अंदाज पालिकेच्या २०२०-२१ वर्षांच्या अर्थसंकल्पात वर्तविण्यात आला होता. त्यानुसार पहिल्या तिमाहीत पालिकेला ४,९४९.५५ कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित होते. मात्र करोनामुळे निर्माण परिस्थितीत तीन महिन्यात केवळ ९६६.३० कोटी रुपये महसूल पालिकेच्या तिजोरीत जमा झाला. त्यामुळे मोठे प्रकल्प आणि हाती घेण्यात येणाऱ्या कामांचा प्राधान्यक्रम निश्चित करण्याची वेळ पालिकेवर ओढवली आहे.

अशा स्थितीत पेडर रोड परिसरातील एम.एल. डहाणूकर मार्गावरील पालिका आयुक्तांच्या बंगल्याच्या डागडुजीकरिता ४० लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे.

बंगल्याच्या रंगरंगोटीबरोबरच बर्मा टीकपासून तयार केलेला पलंग, खुच्र्या, टेबल, कपाट, तसेच महत्त्वाच्या खोल्यांची शोभा वाढविण्यासाठी आकर्षक असे झुंबर आदी साहित्याचाही या खर्चात समावेश आहे. या कामासाठी १७ ऑगस्टपर्यंत पालिकेकडे निविदा सादर करायच्या आहेत.

पालिकेचे उत्पन्न घटल्यामुळे दस्तुरखुद्द आयुक्तच काटकसरीचा सल्ला देत आहेत. अशा परिस्थितीत तातडीने आयुक्त बंगल्याची डागडुजी करण्याची काय आवश्यकता आहे, असा सवाल विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला. तर, सध्याच्या परिस्थितीत आयुक्तांनी स्वत:च काटकसर करायला हवी. प्रशासनाने जारी केलेल्या ई-निविदा तात्काळ रद्द कराव्या, अशी मागणी समाजवादी पार्टीचे गटनेते रईस शेख यांनी केली. पालिकेची आर्थिक स्थिती नाजूक झाली आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाने उधळपट्टी करू नये, असा सल्ला भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दिला.

आयुक्त बंगल्यात पावसाने १० ते १२ ठिकाणी गळती होत आहे. छतावर प्लास्टिकचे कापड घालण्यात आले तरी गळणारे  पाणी जमा करण्यासाठी बादली लावावी लागते. पुरातन वारसा लाभलेला हा बंगला धोकादायक स्थितीत आहे. त्यामुळे त्याची दुरुस्ती करणे वा तो पाडून टाकणे असे दोन पर्याय आहेत. म्हणून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येत आहे. मी अद्याप तेथे वास्तव्यासाठी गेलेलो नाही. दुरुस्ती झाल्यास बंगला वास्तव्यास योग्य होईल.

– इक्बाल सिंह चहल, आयुक्त, मुंबई महापालिका

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2020 12:24 am

Web Title: consideration to spend rs 40 lakh on repair of commissioners bungalow abn 97
Next Stories
1 गणेशोत्सवानिमित्त कोकणासाठी रेल्वेच्या १८२ विशेष फेऱ्या
2 युती सरकारच्या काळातील शिक्षक मान्यता घोटाळ्याची चौकशी
3 दंतवैद्यकीय आणि पदव्युत्तर वैद्यकीय परीक्षांच्या स्थगितीस नकार
Just Now!
X