बोरिवली, वांद्रे, गोरेगावमध्ये रुग्णसंख्येत सातत्याने वाढ

मुंबई : मुंबई महापालिकेच्या २४ पैकी १० प्रशासकीय विभागांमधील रुग्णदुपटीचा काळ १०० दिवसांच्या पलीकडे गेला आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून यापैकी काही विभागांमध्ये रुग्णसंख्या वाढू लागली आहे. यात बोरिवली, वांद्रे, गोरेगावसह काही विभागांचा समावेश आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी प्रवाशांनी केलेली धावपळ, तर खरेदीसाठी भाविकांनी केलेली गर्दी रुग्णवाढीला कारणीभूत ठरू लागल्याची चर्चा सुरू आहे.

करोना चाचण्यांचे वाढविण्यात येत असलेले प्रमाण, करोनाबाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा घेतलेला शोध, बाधित आणि संशयित सर्वसामान्यांच्या संपर्कात येऊ नयेत म्हणून घेतलेली काळजी, सामाजिक अंतराच्या नियमांची सक्ती आदी उपाययोजनांमुळे गणेशोत्सवापूर्वी मुंबईतील अनेक भागांमधील रुग्णसंख्या कमी होऊ लागली होती. मात्र गणेशोत्सवानिमित्त प्रवाशांची कोकणातील गावी जाण्यासाठी धावपळ उडाली होती. गणेशोत्सवापूर्वी सात दिवसांमध्ये गावी जाणाऱ्यांना करोना चाचणी सक्तीची करण्यात आली होती. मात्र गावी जाण्यापूर्वी खरेदीच्या निमित्ताने या मंडळींना बाजारांमध्ये गर्दी केली होती. तसेच गणेशोत्सवापूर्वी भाविकांनी मुंबईतील सर्वच प्रमुख बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी प्रचंड गर्दी केली होती. परिणामी, गेल्या काही दिवसांपासून विविध भागांत रुग्णसंख्या वाढू लागली आहे.

पालिकेसाठी चिंतेची बाब

बोरिवली, वांद्रे (पश्चिम), कांदिवली, दहिसर, गोरेगाव, कुलाबा, मरिन लाइन्स, ग्रॅन्ट रोड भागात सातत्याने रुग्णसंख्या वाढत आहे. पालिकेने या भागात केलेल्या उपाययोजनांनंतर मधल्या काळात रुग्णसंख्या नियंत्रणात येताना दिसत होती. मात्र पुन्हा त्यात हळूहळू वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब पालिकेसाठी चिंतेची ठरू लागली आहे.

कुर्ला परिसरात रुग्ण दुपटीचा कालावधी १४२ दिवसांवर

रुग्णसंख्या घसरल्याने पालिकेच्या ‘एल’ म्हणजे कुर्ला आणि आसपासच्या परिसरातील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १४२ दिवसांवर पोहोचला. मात्र २५ ऑगस्टपासून या भागातील रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. २५ ऑगस्ट रोजी १७, २६ ऑगस्ट रोजी ३२, २७ ऑगस्ट रोजी ३४, २८ ऑगस्ट रोजी ३५, त २९ ऑगस्ट रोजी ४१ नवे रुग्ण आढळले. खार (एच-पूर्व), भांडुप (एस), दादर (जी-उत्तर), अंधेरी (के-पूर्व), एल्फिन्स्टन (जी-दक्षिण), भायखळा (ई), सॅण्डहर्स्ट रोड (बी), चेंबूर – पूर्व (एम-पूर्व), चेंबूर पश्चिम (एम-पश्चिम) या भागांत सध्या रुग्ण दुप्पट होण्याचा काळ १०० दिवसांहून अधिक आहे.