एका महिला कॉन्स्टेबलने खार पोलीस स्टेशनमधल्या शिवानंदा बाराचारे (३७) या कॉन्स्टेबलवर बलात्काराचा आरोप केला आहे. पीडित महिला कॉन्स्टेबल मूळची सोलापूरची असून शिवानंदाने लग्नाचे आश्वासन देऊन तिच्याबरोबर संबंध ठेवले. शिवानंदाचे लग्न झाले आहे पण त्याने ते पीडित महिलेपासून लपवून ठेवले. मुंबई मिररने हे वृत्त दिले आहे.

मागच्या आठवडयात सत्र न्यायालयाने शिवानंदा बाराचारेचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. तेव्हापासून तो फरार आहे. बाराचारेची पीडित महिला कॉन्स्टेबलबरोबर पोलीस भरतीच्या निमित्ताने पहिल्यांदा ओळख झाली. त्याने गुंगीचे औषध मिसळून पीडित महिलेवर पहिल्यांदा बलात्कार केला. जेव्हा तिने जाब विचारला. तेव्हा लग्न करण्याचे आश्वासन दिले.

पीडित महिला शिवानंदा बाराचारेपासून गर्भवती सुद्धा होती. पण तिने गर्भपात केला. पीडित महिला मागच्यावर्षी २८ एप्रिलला पोलीस भरती परीक्षा देण्यासाठी मुंबईत आली होती. गावात रहाणाऱ्या शेजाऱ्यांनी तिला शिवानंदा बाराचारेचा फोन नंबर दिला होता. त्यामुळे मुंबईत दाखल झाल्यापासून ती बाराचारेच्या संपर्कात होती. त्यानेच तिला परीक्षा केंद्रावर सोडले.

परीक्षा दिल्यानंतर तिने शिवानंदाला फोन केला. त्यावेळी रात्रीची ट्रेन असल्यामुळे त्याने तिला जवळच्या लाँजमध्ये विश्रांतीसाठी थांबण्यास सांगितले. त्यादिवशी त्याने गुंगीचे औषध पाजल्यानंतर पहिल्यांदा तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर दोघेही संपर्कात होते. बाराचारे पीडित महिलेच्या आईला सुद्धा भेटला. जेव्हा तिची आई लग्नाबद्दल विचारायची तेव्हा शिवानंदा उडवाउडवीची उत्तरे द्यायचा.

मागच्यावर्षी जून महिन्यात जेव्हा महिला बाराचारेच्या घरी पोहोचली तेव्हा तो आधीपासून विवाहित असल्याचे समजले. शिवानंदा बाराचारेने आपण लवकरच घटस्फोट घेणार असल्याचे तिला पटवून दिले. त्यानंतर दोघांचे लैंगिक संबंध सुरुच होते. अखेर मार्च महिन्यात तिने तक्रार नोंदवली.

बलात्कार वर्षभरापूर्वी झाला आहे. पीडित महिलेने तक्रार दाखल करण्यासाठी उशीर केला असे शिवानंदा बाराचारेने आपल्या वकिलामार्फत युक्तीवाद केला. लैंगिक संबंध ठेवताना तिची संमती होती. त्यामुळे बलात्काराचा विषय येत नाही असा युक्तीवाद बाराचारेच्या वकिलाने केला.