18 February 2020

News Flash

महालक्ष्मीला रेल्वे मार्गावर दोन पूल उभारणार

महालक्ष्मी रेल्वे स्थानकावरील पूल ९० ते १०० वर्षे जुना असून त्याचे आयुर्मान पूर्ण झाले आहे

सागरी किनारा मार्ग उभारणीनंतर वाहतुकीचे नियमन करण्यासाठी निर्णय; ७४५.६९ कोटी रुपये खर्च

मुंबई : सागरी किनारा मार्गाच्या उभारणीनंतर वाहतुकीचे नियमन सुरळीत व्हावे यासाठी महालक्ष्मी येथील डॉ. ई. मोझेस मार्ग आणि केशवराव खाडय़े मार्ग येथे रेल्वे मार्गावरून जाणारे दोन उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी ७४५.६९ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.

दक्षिण मुंबईमधून पश्चिम उपनगरांमध्ये झटपट पोहोचता यावे, वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटावा या उद्देशाने नरिमन पॉइंट ते कांदिवली दरम्यान मुंबई सागरी किनारा मार्ग उभारण्यात येत आहे. मरिन ड्राइव्ह ते वरळी-वांद्रे सागरी सेतूपर्यंतच्या सागरी किनारा मार्ग उभारणीचे काम पालिका स्वत:च करीत आहे. सागरी किनारा मार्गावरून महालक्ष्मी आणि आसपासच्या परिसरात जाण्यासाठी डॉ. ई. मोझेस रोड आणि केशवराव खाडय़े मार्गावर रेल्वे मार्गावरून दोन उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यामुळे महालक्ष्मी आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना आपल्या वाहनाने सागरी किनारा मार्गावर जाणे सोयीचे ठरणार आहे. या पुलांच्या उभारणीसाठी स्पेक्ट्रम टेक्नो कन्सल्टंट प्रा. लिमिटेडची तांत्रिक सल्लागार म्हणून, तर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबईची (आयआयटी) फेरतपासणीसाठी नियुक्ती करण्यात आली होती. स्पेक्ट्रम टेक्नो कन्सल्टंट कंपनीने या पुलांसाठी संकल्पचित्रे, सर्वसाधारण आराखडे तयार केले असून त्यास रेल्वे प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे.

या पुलांच्या उभारणीसाठी अंदाजे ५०७ कोटी ९६ लाख ६६ हजार ६१२ रुपये खर्च येईल, असा पालिकेची अपेक्षा आहे. हा अंदाजित खर्च नमूद करून पुलांच्या उभारणीसाठी पालिकेने निविदा जारी केल्या होत्या. निविदा प्रक्रियेत ४.२५ टक्के अधिक दराने निविदा सादर करणाऱ्या अ‍ॅप्को- सीआरएफजी या संयुक्त कंपनीला ७४५ कोटी ६९ लाख ५३ हजार ३२७ रुपयांचे कंत्राट देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. अ‍ॅप्कोची भागीदार कंपनी असलेली सीआरएफजी कंपनी चीनमधील असून या दोन्ही कंपन्यांची पालिका दरबारी नोंदणी नाही. त्यामुळे स्थायी समितीने प्रस्तावास मंजुरी दिल्यानंतर कार्यादेश हाती पडल्यावर तीन महिन्यांमध्ये या कंपन्यांना पालिकेमध्ये नोंदणी करावी लागणार आहे. तसेच पावसाळा वगळता ३६ महिन्यांमध्ये या पुलांची उभारणी करावी लागणार आहे.

सध्याचा पूल पाडणार

महालक्ष्मी रेल्वे स्थानकावरील पूल ९० ते १०० वर्षे जुना असून त्याचे आयुर्मान पूर्ण झाले आहे. या पुलावर कायम वाहतूक कोंडी होत असते. सुधारित विकास नियोजन आराखडा २०३४ मधील तरतुदीनुसार सागरी किनारा मार्ग प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर वाहतुकीचे नियमन करण्यासाठी महालक्ष्मी येथे पूल बांधण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. त्यानुसार या दोन पुलांचे बांधकाम करण्यात येणार आहे. यामुळे भविष्यात महालक्ष्मी येथील पूल काळाच्या पडद्याआड जाण्याची चिन्हे आहेत.

First Published on January 21, 2020 3:03 am

Web Title: construction of two bridges on mahalaxmi railway line zws 70
Next Stories
1 उपनगरीय गाडय़ांमध्ये वस्तू विक्री योजना
2 ‘रात्रजीवना’चा फायदा सार्वजनिक वाहतुकीला?
3 मुंबई विद्यापीठाचा पत्रकारिता विभाग नेतृत्वहीन
Just Now!
X