बांधकामांच्या ठिकाणी पैसे उकळले

मुंबईत अस्वच्छता करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसाठी नेमण्यात आलेले क्लीनअप मार्शल आता बांधकामांच्या ठिकाणी जाऊन पैसे उकळू लागले आहेत. महापालिकेच्या ‘ए’ विभागात असे प्रकार निदर्शनास आले असून दोघा क्लीनअप मार्शल विरोधात महापालिकेच्या वतीने माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मुकेश गुप्ता आणि अर्जुन लष्कर राणा अशी त्यांची नावे आहेत आणि हे दोघेही ‘सिंग इंटेलिजन्स सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी’चे कर्मचारी आहेत.

मुंबईत स्वच्छता राखण्यासाठी महापालिकेने सर्व विभाग कार्यालयांच्या हद्दीत स्वतंत्र संस्थेची नियुक्ती करून क्लीनअप मार्शलची नेमणूक केली आहे. त्यानुसार ए विभागात ‘सिंग इंटलिजन्स सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी’ची नियुक्ती केली आहे. ए विभागातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, फोर्ट विभाग,काळाघोडा, म्युझियम, पोलिस मुख्यालय, गेटवे परिसर, कुलाबा, नरिमन पॉईंट, मरिन ड्राईव्ह, मंत्रालय, कफपरेड, गीता नगर, तसेच गणेश मूर्ती नगर आदी परिसरांत या संस्थेचे क्लीन अप मार्शल तैनात आहेत. त्यांना रस्त्यांवर थुंकणे, कचरा फेकणे, परिसरात घाण करणे, उघडय़ावर शौचास जाणे आदी विविध गुन्ह्य़ांप्रकरणी कमीत कमी १०० रुपये ते जास्तीत जास्त १ हजार रुपये दंड आकारण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

परंतु काही क्लीन अप मार्शल महापालिकेचे कर्मचारी असल्याचे भासवून पैसे मागत असल्याच्या तक्रारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे आल्या होत्या. मुकेश गुप्ता व अर्जुन राणा हे क्लीन अप मार्शल विभागात नेमून दिलेल्या ठिकाणी न जाता ‘ए’ विभागातील बांधकामांच्या ठिकाणी जावून लोकांकडून पैसे उकळत असल्याचे समोर आले. त्यामुळे संस्थेला कारणे दाखवा नोटीस बजावून या दोघा क्लीनअप मार्शल विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

महापालिकेच्या ‘ए’ विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याला दुजोरा दिला. या विभागातील दोन क्लीन अप मार्शल बांधकामांच्या ठिकाणी आपण महापालिकेचे कर्मचारी असल्याचे भासवून त्यांच्याकडून पैसे उकळत होते. त्यामुळे त्यांच्याविरोधात माता रमाबाई पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगितले. तसेच संबंधित संस्थेला कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.