मुंबईतील एल्फिन्स्टन पूल दुर्घटनेला जवळपास दीड महिना उलटला आहे. आता या पुलाच्या बांधकामाला मंगळवारपासून पुन्हा एकदा सुरुवात झालीये. या पुलाचे काम लष्कराकडे सोपवण्यात आले आहे. या पुलाजवळ असलेले जुने खांब सगळ्यात आधी तोडायला सुरुवात झाली. प्राथमिक स्वरूपातली तोडक कारवाईही सुरु करण्यात आली. अनधिकृत बांधकांमाचा विळखा हटवण्याचे कामही सुरु करण्यात आले. कमी कालावधीत पादचारी पूल बांधण्याची मोठी जबाबदारी लष्करावर आहे. बेली ब्रिज तंत्रज्ञानाचा वापर करत हा पूल बांधण्यात येणार आहे. या नव्या तंत्रज्ञानामुळे कमी मनुष्यबळाचा वापर करत हा पूल बांधला जाईल. ३१ जानेवारी २०१८ पर्यंत हा पूल बांधून होईल असे लष्कराने स्पष्ट केले आहे.

२९ सप्टेंबर रोजी सकाळी १०.४५ च्या सुमारास एल्फिन्स्टन ब्रिजवर चेंगराचेंगरी झाली. हा पूल अरूंद असल्याने झालेल्या चेंगराचेंगरीत २३ प्रवाशांचा मृत्यू झाला तर ३८ प्रवासी जखमी झाले. दोन्ही ट्रॅकवर एकाच वेळी ट्रेन आल्यामुळे मोठी गर्दी उसळली. तसेच पाऊस सुरु झाल्याने अनेक प्रवाशांनी पुलाचा आधार घेतला. गर्दी उसळल्याने मोठ्या प्रमाणावर चेंगराचेंगरी झाली. या सगळ्या घटनेनंतर तातडीने ज्या स्थानकांवरचे पूल अरुंद आहेत त्यांचा आढावा घेण्यात आला.

३१ ऑक्टोबर २०१७ रोजी केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर भाजप नेत्यांनी एल्फिन्स्टन पुलाचा आढावा घेतला. त्यानंतर एल्फिन्स्टन, करी रोड आणि आंबिवली या तीन स्थानकांवर लष्कर पूल बांधणार असल्याचे जाहीर केले. या घोषणेनंतर आता १५ दिवसांनी या पुलाचे काम सुरु झाले आहे. पुढील ९० दिवस हे काम चालणार असून या तिन्ही स्थानकांवर मोठे पादचारी पूल बांधण्यात येतील.