मेंदूरोगतज्ज्ञ डॉ. पंडय़ा यांच्यावरील दोषारोप ग्राहक आयोगाकडून रद्द

१५ वर्षांपूर्वी मेंदूवर केलेल्या दोन शस्त्रक्रियांमुळे मेंदूरोगतज्ज्ञ डॉ. एस. के. पंडय़ा यांच्यावर ठेवण्यात आलेला वैद्यकीय निष्काळजीपणाचा ठपका राज्य ग्राहक आयोगाने अखेर १५ वर्षांनंतर पुसला आहे. डॉ. पंडय़ा यांनी कुठल्याही प्रकारचा वैद्यकीय निष्काळजीपणा केलेला नाही, असे स्पष्ट करीत आयोगाने त्यांच्याविरोधात दाखल केलेली तक्रारही फेटाळून लावली. विशेष म्हणजे एका डॉक्टरनेच डॉ. पंडय़ा यांच्याविरोधात ही तक्रार केली होती.

उत्तर प्रदेश येथील डॉ. डी. सी. नायक यांनी जसलोक रूग्णालय, डॉ. एन. एच. वाडिया आणि डॉ. एस. के. पंडय़ा यांच्याविरोधात वैद्यकीय निष्काळजीपणाची तक्रार दाखल केली होती. डॉ. नायक यांच्यामध्ये ‘ब-१२’ या जीवनसत्त्वाची कमतरता होती. त्यामुळे त्यांच्यावर जसलोक रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु उपचारांमध्ये वैद्यकीय निष्काळजीपणा करण्यात आल्याचा दावा करीत त्यामुळे झालेल्या नुकसानापोटी ८० लाख रुपये देण्याची मागणी त्यांनी आयोगाकडे केली होती. शिवाय कायदेशीर लढय़ासाठीचा एक लाख व २००१ पासून वैद्यकीय उपचारांसाठी आलेला खर्च म्हणून तीन लाख रुपये देण्याची मागणीही त्यांनी तक्रारीत केली होती.

आयोगाने मात्र त्यांच्या तक्रारीवर निकाल देताना बॉम्बे हॉस्पिटलशी संबंधित दोन प्रख्यात मेंदूरोगतज्ज्ञांनी दिलेले मत प्रामुख्याने गृहीत धरले. या दोन्ही मेंदूरोगतज्ज्ञांनी डॉ. पंडय़ा यांच्या बाजूने हे मत दिले होते. डॉ. नायक यांना झालेला आजार हा पूर्ण बरा होऊ शकेल असा नाही. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडण्यास जसलोक वा तेथील डॉक्टरना जबाबदार धरता येऊ शकत नाही, असे मत या तज्ज्ञांनी दिले होते. दुसरे म्हणजे गोरखपूर येथे रेडिओलॉजिस्ट असलेल्या डॉ. पंडय़ा यांनी तक्रार करताना एकही प्रतिज्ञापत्र दाखल केले नाही. शिवाय डॉ. पंडय़ा यांनी शस्त्रक्रिया करताना निष्काळजीपणा केला हे सिद्ध करणारे तज्ज्ञांचे मतही त्यांनी तक्रारीसोबत जोडले नाही. त्यामुळे डॉ. पंडय़ा यांनी शस्त्रक्रिया करताना निष्काळजीपणा केला होता हे सिद्ध करण्यात डॉ. नायक हे अपयशी ठरले असून ते नुकसानभरपाईसाठी पात्र ठरत नाहीत, असे नमूद करीत न्यायालयाने त्यांची तक्रार फेटाळून लावली.

‘शस्त्रक्रिया योग्यच’

डॉ. पंडय़ा यांनी केलेल्या शस्त्रक्रियेमुळे डॉ. नायक यांच्या दोन्ही पायांची हालचाल करणे अशक्य झाले आणि त्यांना व्हीलचेअरचा आधार घ्यावा लागला, असा दावा नायक यांच्या वतीने करण्यात आला होता. जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे पाठीच्या पृष्ठभागाशी संबंधिततंतूची रचना बदलते. परिणामी पाठीच्या कण्याची शस्त्रक्रिया हाच त्यावरील एक उपाय असतो. परंतु ही शस्त्रक्रिया डॉ. पंडय़ा यांच्या निष्काळजीपणामुळे चुकीच्या पद्धतीने करण्यात आली, असाही आरोप डॉ. नायक यांच्या वतीने युक्तिवादाच्या वेळी करण्यात आला. परंतु या दाव्याचे खंडन करीत प्रत्यक्षात या शस्त्रक्रियेमुळे रुग्णाची स्थिती बदलते आणि कमीत कमी आधार घेऊन तो चालू शकतो, असा दावा डॉ. पंडय़ा यांच्या वतीने करण्यात आला.