ग्राहक मंचचा कंपनीला तडाखा

मुंबई : गिरणी कामगारांचे वास्तव्य असलेल्या इमारतीच्या उद्वाहनाची दुरुस्ती आणि देखभालीचा खर्च घेऊनही सेवा न देणाऱ्या व्यावसायिकाला ग्राहक मंचाने तडाखा दिला आहे. संबंधित सहकारी गृहनिर्माण संस्थेला उद्वाहनाची दुरुस्ती करवून घेण्यासाठी आलेला खर्चही देण्याचा निर्णय मंचाने सुनावला आहे. त्यामुळे व्यावसायिकाकडून गृहनिर्माण संस्थेला पावणेदहा लाख रुपये परतावा मिळणार आहे.

शीव चुनाभट्टी येथील मे. १ ई आकाशगंगा को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी ही इमारत १८ मजल्यांची असून त्यामध्ये गिरणी कामगारांची २८६ कुटुंबे वास्तव्याला आहेत. या इमारतीच्या उद्वाहनाच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी इलेकॉन एलेव्हेटर्स अ‍ॅण्ड एस्केलेटर्स सव्‍‌र्हिस सेंटर या कंपनीशी करार केला होता. त्यापोटी या गृहनिर्माण संस्थेने ५ लाख रुपये कंपनीला अदा केले होते. मात्र या कंपनीने उद्वाहनाची दुरुस्ती केली नाही. कंपनीशी वारंवार संपर्क साधूनही उद्वाहनाची दुरुस्ती केली जात नव्हती. परिणामी या इमारतीमधील ३ पैकी २ उद्वाहने दीड महिन्यासाठी बंद होती. एकाच उद्वाहनाने ये-जा करावी लागत असल्याने त्याचा मोठा मनस्ताप रहिवाशांना सहन करावा लागत होता. कंटाळून गृहनिर्माण संस्थेने दुसऱ्या कंपनीला ३ लाख ७० हजार रुपये देऊन उद्वाहनाची दुरुस्ती करवून घेतली. तसेच इलेकॉन या कंपनीला पैसे परत देण्याची मागणी केली. मात्र पैसे परत न मिळाल्याने अखेर या गृहनिर्माण संस्थेने ग्राहक मंचाचा दरवाजा ठोठावला. मंचाने गृहनिर्माण संस्थेची बाजू ऐकून कंपनीविरुद्ध निकाल दिला.

९ लाख ७५ हजार रुपये भरपाई

गृहनिर्माण संस्थेला भरपाईपोटी ५ लाख रुपये, दुसऱ्या कंपनीकडून उद्वाहन दुरुस्तीसाठी आलेला ३ लाख ७० हजार रुपयांचा खर्च, तसेच उद्वाहनाची दुरुस्ती न केल्यामुळे इमारतीमधील सदस्यांना झालेल्या त्रासापोटी १ लाख रुपयांची भरपाई आणि तक्रारीच्या खर्चापोटी ५ हजार रुपये असे एकूण ९ लाख ७५ हजार रुपये देण्याचा आदेश मंचाने दिला आहे. तसेच ही भरपाई एक महिन्याच्या आत न दिल्यास ९ टक्के व्याजदराने रक्कम परत करण्याचा आदेश दिला आहे.