एका महिलेला स्तनाचा कर्करोग असल्याचे चुकीचे निदान करून शस्त्रक्रियेद्वारे तिचा उजवा स्तन काढून टाकणाऱ्या डॉक्टर व रुग्णालयाला ग्राहक मंचाने एक लाख रुपयांची नुकसानभरपाई व शस्त्रक्रियेसाठी आलेला ४१ हजार रुपयांचा खर्च देण्याचे आदेश दिले आहेत. आठ वर्षांपूर्वी हा प्रकार घडला होता.
उजव्या बाजूच्या स्तनात वेदना होत असल्याची तक्रार घेऊन २००५ मध्ये संबंधित महिला प्रिन्स अली खान रुग्णालयातील डॉ. सुलतान प्रधान यांच्याकडे वैद्यकीय उपचारांसाठी आली. त्या वेळी डॉ. प्रधान यांनी तिला हिस्टोपॅथॉलॉजिस्ट समुपदेशक डॉ. मीरा देसाई यांच्याकडे ‘फाईन नीडल अस्पिरेशन कायटोलॉजी’ चाचणी करण्याचा सल्ला दिला. चाचणीत या महिलेला स्तनाचा कर्करोग झाल्याचे निदान करण्यात आले. त्यानंतर डॉ. प्रधान यांनी या महिलेला शस्त्रक्रियेद्वारे स्तन लगेचच काढून टाकण्याचा सल्ला दिला. त्यामुळे या महिलेने डॉ. प्रधानांचा सल्ला मान्य करीत शस्त्रक्रिया केली.
दरम्यान, डॉक्टरांचे वागणे संशयास्पद वाटल्याने या महिलेने मार्च २००६ मध्ये टाटा रुग्णालयात नव्याने तपासणी केली. तेव्हा कुठल्याही प्रकारचा कर्करोग अथवा त्याची लक्षणे नसल्याचे निदान झाले. ससंर्गामुळे वेदना होत होत्या आणि शस्त्रक्रियेशिवायही समस्या दूर झाली असती, असेही निष्पन्न झाले. या धक्क्यातून सावरल्यानंतर या महिलेने २००७ मध्ये डॉ. सुलतान प्रधान आणि प्रिन्स अली खान रुग्णालयाविरोधात ग्राहक मंचात तक्रार दाखल केली.
डॉ. प्रधान आणि रुग्णालयाने सर्व आरोपांचे खंडन करीत महिलेची तक्रार फेटाळून लावण्याची मागणी केली. परंतु मंचाने त्यांचा दावा आणि मागणी फेटाळून महिलेच्या बाजूने निर्णय दिला.