करोनामुळे गेले दोन महिने जानेवारी-फे ब्रुवारीच्या सरासरीने वीज देयके  दिल्यानंतर आता महावितरण, अदानी, टाटा, बेस्ट या सर्व वीज कंपन्या प्रत्यक्ष वीजवापराची नोंद घेऊन आकारणी करत असल्याने उन्हाळ्यातील वाढीव वीजवापराचा बोजा ग्राहकांवर पडणार आहे. मात्र, त्यामुळे वाढीव वीज देयकांच्या समजामुळे ग्राहक-वीज कंपनीत संघर्ष सुरू झाला आहे.

करोनामुळे मार्चच्या शेवटच्या आठवडय़ापासून वीजवापराची नोंद घेऊन वीज देयक आकारण्याचे काम बंद झाले. महावितरण, अदानी, टाटा, बेस्ट या सर्व वीज वितरण कंपन्यांनी मागील वीजवापराच्या सरासरीनुसार एप्रिल-मे महिन्यांत वीज देयके  आकारली. मार्चमध्ये वीजवापराची नोंदणी घेणे, मीटरवाचन बंद पडल्याने सरासरीसाठी जानेवारी, फेब्रुवारी या महिन्यांतील वीजवापर गृहीत धरला गेला. त्या काळात थंडीमुळे वातानुकूल यंत्रे, पंखे यांचा वीजवापर तुलनेत कमी असतो. मात्र मार्चच्या उत्तरार्धापासून एप्रिल, मे व जून महिन्यात वाढत्या उन्हामुळे वीजवापर वाढतो. मुंबई व महाराष्ट्रातील कमाल वीजमागणी सर्वसाधारणपण याच कालावधीत नोंदवली जाते.

आता टाळेबंदी शिथिल झाल्याने सर्वच वीज वितरण कंपन्यांनी वीजग्राहकांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष वीजवापरानुसार वीज देयक आकारणी सुरू केली आहे. त्यामुळे उन्हाळ्यातील वाढीव वीजवापराचे फटके  वीज देयकात दिसत आहेत. एरवी उन्हाळ्यात घरगुती ग्राहकांचा वीजवापर किमान २० ते ३० टक्के वाढतो. आता तर टाळेबंदीमुळे एप्रिल व मे महिन्यांत यंदा लोक घरीच बसून होते. त्यामुळे पंखे, टीव्ही आणि वातानुकूलन यंत्रणा, संगणक आदींचा वीजवापर नेहमीच्या उन्हाळ्यापेक्षाही जास्त वाढला. त्याचे प्रतिबिंब वीज देयकात पडत असून लोकांना वीजवापरानुसार देयके  येत आहेत.

तज्ज्ञांचे मत

शिवाय सरासरी आणि प्रत्यक्ष वीजवापरातील तफावतीची दोन महिन्यांतील रक्कमही त्या वीज देयकात समाविष्ट आहे. त्यामुळे अचानक आपल्याला अधिक रकमेचे वीज देयक आल्याचा समज वीजग्राहकांचा होत आहे. त्यामुळे वास्तव समजून घेऊन वीजग्राहकांनी आपले वीज देयक तपासले पाहिजे. वीज कंपनी चुकीचे वीज देयकच देत आहे, असा गैरसमज करून घेऊ नये, असे वीजतज्ज्ञ अशोक पेंडसे यांनी नमूद केले. मात्र, त्याचबरोबर मागील दोन महिन्यांच्या वाढीव वीजवापराचा एकत्र बोजा जूनमधील वीज देयकात एकाच वेळी ग्राहकांवर न टाकता ती रक्कम दोन-तीन टप्प्यांत वसूल करावी, अशी मागणीही पेंडसे यांनी केली.