18 January 2019

News Flash

कुटुबकट्टा : नवतेची पावले

भविष्यात कोणकोणत्या तंत्रउपकरणांशी आपले बंध जुळणार आहेत, हे जाणून घ्यायचं असेल तर ‘सीईएस’मध्ये डोकावलंच पाहिजे.

तंत्रज्ञान दिवसागणिक प्रगत होत असतं. कालपरवा बाजारात आलेलं एखादं नवीन गॅझेट वा उपकरण आज सर्वसामान्य होऊन जातं आणि नवीन तंत्र उपकरण बाजारातील प्रवेशासाठी दार ठोठावत असतं. तंत्रज्ञानातील नवतेच्या या ध्यासाला कुठल्या नवीन वर्षांची ओढ नसते. पण अमेरिकेत दरवर्षी जानेवारीच्या पूर्वार्धात भरणाऱ्या कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शोअर्थात सीईएसया प्रदर्शनाची प्रतीक्षा अवघ्या तंत्रजगताला असते. नवीन वर्षांत तंत्रज्ञान किती लांबचा पल्ला ओलांडेल, हे या प्रदर्शनातून उमजत असतं. त्यामुळेच भविष्यात कोणकोणत्या तंत्रउपकरणांशी आपले बंध जुळणार आहेत, हे जाणून घ्यायचं असेल तर सीईएसमध्ये डोकावलंच पाहिजे. यंदा लास वेगासमध्ये येत्या रविवारपासून रंगणाऱ्या या तंत्रमेळय़ात सादर होणाऱ्या आविष्कारांची ही झलक..

हवेतल्या हवेत चार्जिग

‘वायरलेस चार्जिग’ ही संकल्पना तुम्हाला आकर्षक वाटत असेल तर, थांबा! नव्या वर्षांत कदाचित तुम्ही तुमचा स्मार्टफोन हवेतल्या हवेतही चार्ज करू शकता. सध्या मोठमोठय़ा कंपन्यांनी आपल्या उच्च किंमतश्रेणीतील स्मार्टफोनमध्ये ‘वायरलेस चार्जिग’ची सुविधा दिली आहे. या सुविधेमार्फत तुम्ही एका ‘चार्जिग मॅट’वर फोन ठेवताच तो चार्ज होऊ लागतो. अर्थात, या पद्धतीत किमान ‘चार्जिग मॅट’ विद्युतप्रवाहाशी जोडलेली असते. मात्र ‘पॉवरकास्ट’ नावाच्या कंपनीने ‘सीईएस’मध्ये एक असा ट्रान्समीटर मांडला आहे, जो एकाचवेळी तब्बल ८० फूट अंतराच्या परीघक्षेत्रातील उपकरणे चार्ज करू शकतो. यासाठी हा ट्रान्समीटर ९१५ मेगाहार्ट्झ क्षमतेच्या विद्युतचुंबकीय लहरी प्रसारित करतो. या लहरी ‘वायफाय’सारखे प्रभावक्षेत्र निर्माण करून त्या परिघातील उपकरणे चार्ज करू शकतात.

घराचं नियंत्रण यंत्राकडे

‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’ अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित उपकरणांची गेले वर्षभर बाजारात सद्दी होती. ‘गुगल असिस्टंट’ आणि अ‍ॅप्पलचे ‘सिरी’ स्मार्टफोनधारकांना स्पर्शविरहित फोनहाताळणीत उपयुक्त ठरत आहेत. त्याच पद्धतीने ‘स्मार्ट होम’ ही संकल्पनाही अलीकडच्या काळात चर्चेत आहे. पण नवीन वर्षांत या दोन्ही संकल्पना एकमेकांच्या हातात हात मिळवून वापरकर्त्यांच्या सेवेत हजर होणार आहेत. अ‍ॅप्पलने आपली ‘होमकिट’ श्रेणीतील उत्पादने स्वतंत्र चिपऐवजी सॉफ्टवेअरने हाताळता येतील, असे तंत्रज्ञान विकसित केले आहे. तर एलजीने ‘थिनक्यू स्मार्ट स्पीकर’ (ळँ्रल्लद २ें१३ २स्र्ीं‘ी१) आणला असून गुगल असिस्टंटच्या मदतीने हा स्पीकर घरातील एलजीची सर्व ‘स्मार्ट’ उपकरणे नियंत्रित करू शकतो.

कमी किमतीत हायक्लासफोन

स्मार्टफोनच्या वैशिष्टय़ांमध्ये ज्या वेगाने बदल होत जात आहेत, ते पाहता यंदाच्या ‘सीईएस’मध्ये कोणता नवीन स्मार्टफोन पाहायला मिळेल, याची शाश्वती देता येत नाही. मात्र घडी उघडताच टॅब बनणारा सॅमसंगचा स्मार्टफोन प्रदर्शनात असेल, हे निश्चित. यंदा बहुतांश कंपन्यांचा कल स्मार्टफोनमध्ये आणखी बदल करण्यापेक्षा सध्या उच्चकिंमत श्रेणीत असलेल्या स्मार्टफोनमधील वैशिष्टय़े कमी अर्थात परवडणाऱ्या किंमतश्रेणीतील स्मार्टफोनमध्ये कशी आणता येतील, यावर असणार आहे. उदाहरणार्थ, हॉनर ही कंपनी ‘७एक्स’ हा स्मार्टफोन बाजारात आणणार असून ५.९ इंच आकाराची स्क्रीन असलेल्या या फोनमध्ये उच्च दर्जाची वैशिष्टय़े असतील व याची किंमत सुमारे २०० डॉलर (अंदाजे १३-१४ हजार रुपये) असणार आहे.

दीर्घकाळ तग धरणारे लॅपटॉप

लॅपटॉपच्या दुनियेत सध्या सर्वाधिक चढाओढ एकदा चार्ज केल्यानंतर जास्तीत जास्त वेळ काम करणाऱ्या लॅपटॉपच्या निर्मितीत लागली आहे. यंदाच्या ‘सीईएस’मध्ये हीच स्पर्धा रंगलेली दिसेल. एलजीने ‘ग्राम’ नावाने अतिशय कमी वजनाचा लॅपटॉप यंदाच्या प्रदर्शनात मांडण्याचे जाहीर केले आहे. हा लॅपटॉप एकदा चार्ज केल्यानंतर दिवसभर कार्यरत राहू शकेल, असा कंपनीचा दावा आहे. याखेरीज १९ ते २२ तासांपर्यंत चार्जिगविना कार्यरत राहणारे लॅपटॉपही यंदाच्या प्रदर्शनात असतील. यंदा क्वालकॉम या प्रोसेसर बनवणाऱ्या कंपनीच्या प्रोसेसरवर चालणारे एचपी आणि आसूसचे लॅपटॉपही लक्षवेधी ठरणार आहेत.

कणन्कण व्यापणारा टीव्ही

सध्या टीव्हीमध्ये असंख्य प्रकार येत आहेत. फोरके, थ्रीडी टीव्ही किंवा वक्राकार क्यूएलईडी टीव्हींना भारतीय ग्राहकांचीही पसंती मिळत आहे. प्रेक्षकाला जास्तीतजास्त सुस्पष्ट चित्र दर्शवणाऱ्या टीव्हींच्या पंक्तीत यावर्षी मायक्रोएलईडी आणि आवाजाच्या हुकुमावर चालणाऱ्या ओएलईडी टीव्हींची भर पडणार आहे. एलईडी टीव्हीमध्ये स्क्रीनमागे बसवण्यात आलेल्या शेकडो एलईडी दिव्यांचे पॅनेल स्क्रीनवरील दृश्य प्रकाशमान आणि सुस्पष्ट करते. पण मायक्रोएलईडीमध्ये १०० मायक्रोमीटरपेक्षाही कमी आकाराचे हजारो मायक्रोएलईडी ही भूमिका बजावतात. डोक्यावरील केसाच्या जाडीपेक्षाही बारीक असलेल्या या दिव्यांच्या पॅनेलमुळे टीव्हीवरील दृश्यातील कणन्कण अतिशय स्पष्ट दिसू शकणार आहे. याशिवाय हे दिवे कमी वीज वापरणार असल्याने मायक्रोएलईडी टीव्ही वीजबिलांतही बचत करणारे ठरतील. सॅमसंगने अशा टीव्हींच्या निर्मितीत पुढाकार घेतला आहे. सध्या ‘ओएलईडी’ टीव्हींची चलती आहे. मात्र एलजी आणि सोनी या कंपन्या अद्ययावत ‘ओएलईडी’ टीव्ही बनवण्यात गुंतल्या आहेत. हे टीव्ही आवाजी नियंत्रणातून चालतील, अशी अटकळ बांधली जात आहे. दरम्यान, यंदाच्या ‘सीईएस’मध्ये ८के टीव्हीही सादर होणार आहे. ८८ इंचाचा हा टीव्ही एलजीने आणला आहे.

First Published on January 4, 2018 1:44 am

Web Title: consumer electronics show ces exhibition