News Flash

‘एचडीएफसी’ बँकेला ग्राहक आयोगाचा दणका

कुठलीही बँक पूर्वसूचनेशिवाय खातेदाराचे खाते गोठवू शकत नाही आणि क्रेडीट कार्डावर खर्च केलेली रक्कम वसूल करू शकत नाही, असा निर्वाळा देत राज्य ग्राहक वाद निवारण

| July 7, 2013 05:25 am

कुठलीही बँक पूर्वसूचनेशिवाय खातेदाराचे खाते गोठवू शकत नाही आणि क्रेडीट कार्डावर खर्च केलेली रक्कम वसूल करू शकत नाही, असा निर्वाळा देत राज्य ग्राहक वाद निवारण आयोगाने एचडीएफसी बँकेला दणका दिला. तसेच चांदिवली येथील महिलेला ४० हजार रुपयांच्या नुकसानभरपाईसह ७८.५ हजारांचा परतावा देण्याचे आदेश दिले.
क्रेडीट कार्डवर खर्च केलेली नेमकी रक्कम किती, यावरून बँक आणि या महिलेमध्ये बऱ्याच काळापासून वाद सुरू होता. बँकेने आपल्या अधिकाराचा वापर करून कारवाई करण्यापूर्वी वा खाते गोठवण्यापूर्वी, तसेच खर्च केलेली रक्कम वसूल करण्यापूर्वी खातेदाराला त्याची पूर्वसूचना देणे अनिवार्य आहे. नैसर्गिक न्यायाचा हा भाग आहे. परंतु बँकेने असे काहीच न करता खातेदाराचे खाते गोठविले आणि रक्कमही वसूल केली, असे आयोगाने नमूद करीत तक्रारदार महिलेला ४० हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले.
या प्रकरणातील तक्रारदार आरती कृष्णन् यांचे २५ एप्रिल २००६ मध्ये क्रेडीट कार्ड हरविले. त्याची माहिती दिल्यानंतर बँकेने ते रद्द करून कृष्णन् यांना नवे क्रेडीट कार्ड दिले. परंतु कृष्णन् आणि बँक यांच्यामध्ये आधीच्या क्रेडीट कार्डाद्वारे खर्च करण्यात आलेल्या रक्कमेवरून वाद होता. नंतर दोघांनी परस्पर सामंजस्याने तोडगा काढत ही रक्कम २९ हजार रुपये असल्याचे निश्चित केले. त्याचाच भाग म्हणून कृष्णन् यांनी पहिला हप्ता म्हणून चार हजार रुपये बँकेत जमा केले आणि बँकेनेही ती रक्कम स्वीकारली. तडजोडीनुसार कृष्णन् यांना बँकेला उर्वरित २५ हजार रुपये देणे अपेक्षित होते. परंतु बँकेने ही रक्कम २५ नव्हे, तर ५० हजार रुपये असल्याचा दावा करीत कृष्णन् यांना ते भरण्यास सांगितले. आपण याबाबत बँकेकडे तक्रार केली व रक्कम उगाचच फुगवून सांगितल्याबाबत रागही व्यक्त केला. त्यानंतर बँकेने पूर्वसूचना न देताच आपले बँक खाते गोठवले आणि क्रेडीट कार्डवर खर्च केलेली रक्कम म्हणून आपल्या खात्यातून ८० हजार रुपये काढून घेतल्याचा आरोप करीत कृष्णन् यांनी त्या विरोधात ग्राहक न्यायालयात धाव घेतली होती. मात्र २०१२ मध्ये त्यांची तक्रार ग्राहक न्यायालयाने फेटाळून लावल्याने त्यांनी अखेर राज्य आयोगाकडे याविरोधात आव्हान दिले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2013 5:25 am

Web Title: consumer forum notice to hdfc bank said return 78 thousand
Next Stories
1 उखाळ्यापाखाळ्या, आरोप-प्रत्यारोपांतून काँग्रेस-राष्ट्रवादीला राजकीय लाभ!
2 .. आता लाईन ‘वूमनिया!’
3 काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये रण!
Just Now!
X