डंक थंडावले; व्यावसायिकांचे लाखोंचे नुकसान

निलेश अडसूळ, लोकसत्ता

मुंबई : एप्रिल-मे महिन्यात मसाले कुटण्याच्या हंगामी उद्योगाला वाढत्या करोनाचा फटका बसला आहे. लागू केलेल्या कठोर निर्बंधांमुळे ग्राहकांनी मसाले तयार करण्याकडे पाठ फिरवली आहे. परिणामी ग्राहकांच्या गर्दीने गजबजलेला लालबागचा मसाला बाजार यंदा काहीसा ओस झाला आहे. मसाले कांडणाच्या उद्योगाला कामगार नसल्यामुळेही झळ पोहोचली असून घेतलेला कच्चा माल पडून राहण्याची भीती व्यापाऱ्यांना वाटत आहे.

मुंबईतल्या उंच इमारतींमध्ये किंवा चाळीतल्या दाट वस्तीमध्ये मिरच्या आणि मसाल्याचे पदार्थ आणून ते वाळवणे, कच्च्या घटकांचे योग्य प्रमाण साधून  मसाला तयार करणे, त्यासाठी वेळ देणे शक्य नसलेल्या महिला वर्गाला गेली अनेक वर्षे लालबाग येथील मसाले बाजार साथ देत आहे. मुंबईच नाही तर विरार, पालघर, कल्याण, कर्जत ते अगदी पेण-पनवेलहून ग्राहक इथे खास मसाले तयार करून घेण्यासाठी येतात. आपल्या पसंतीचे जिन्नस निवडून डोळ्यांदेखत मसाला तयार होत असल्याने लालबागमध्ये मार्चपासून पावसापर्यंत दिवस-रात्र मिरच्या कुटण्याचे डंक खणखणत असतात. यंदा मात्र कठोर निर्बंधांमुळे या व्यवसायाला फटका बसला आहे. प्रवासावर बंदी आल्याने ग्राहकवर्गाला लालबागपर्यंत पोहोचणे कठीण झाले आहे.

‘गेल्या वर्षीही याच हंगामात टाळेबंदी जाहीर झाल्याने मसाले बाजार बंद झाला. दुकानदारांकडे लाखोंचा माल पडून राहिला. यंदा मार्चअखेरीस ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत होता. पण एप्रिलमध्ये करोनाचे वाढते प्रमाण आणि वाढत्या निर्बंधांमुळे ग्राहकसंख्या कमी झाली. आता तर अधिक कठोर निर्बंध लागू झाल्याने बाजार ओस पाडला आहे,’ असे मसाले विक्रेत्यांनी सांगितले.

लालबाग मसाले बाजारातील प्रत्येक दुकानदार संक्रांतीच्या मुहूर्तावर लाखोंचा माल खरेदी करतात. मसाल्याचे घटक पडून राहिले तर काही वेळा त्याचा गंध, स्वाद कमी होतो. पावसाळ्यात काही पदार्थाना बुरशीही लागते. त्यामुळे गेल्या वर्षी मार्चनंतर व्यवसाय ठप्प झाल्याने कच्चा माल पूर्णत: वाया गेला. यंदाही तीच परिस्थिती आहे. गुरुवारी दिवसभरात एकही ग्राहक बाजारात आला नाही.

– अजित गायकवाड, सचिव, लालबाग बाजारपेठ

ग्राहक आपल्यापर्यंत येऊ शकत नाही म्हणून आम्ही ग्राहकांपर्यंत पोहोचायचे ठरवले आहे. दरवर्षी हक्काने येणाऱ्या ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन त्याची पूर्तता केली जाईल. तसेच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तुमच्या नजरेसोमोर तुमचा मसाला तयार करून घरी पाठवण्याची व्यवस्था करता येईल का यावरही विचार सुरू आहे. परिस्थिती कठीण असल्याने त्यातून मार्ग काढत व्यवसाय करावा लागेल.        

-विक्रम चव्हाण, चव्हाण ब्रदर्स मसाले