मालाडच्या मालवणी भागात विषारी गावठी दारू प्यायल्याने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ४१ झाली आहे. अत्यवस्थ असलेल्या आणखी २१ जणांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू असून, त्यापैकी काहीजणांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांची संख्या अजून वाढण्याची भीती आहे. दरम्यान, याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह सात पोलीसांना निलंबित करण्यात आले आहे.
मालाड येथील मालवणी भागातल्या राठोडी गावातील ज्युरासिक पार्क रिसॉर्टलगत लक्ष्मीनगर झोपडपट्टी आहे. तेथील काही मजूर बुधवारी रात्री राजूच्या गुत्त्यावर दारु पिण्यासाठी गेले होते. गुरुवारी पहाटेपासूनच त्यांना त्रास होऊ लागला. पोटात मळमळू लागले आणि उलटय़ा सुरू झाल्याने त्यांना विविध रुग्णालयांत दाखल केले गेले. सकाळी नऊ वाजता पहिल्या मजुराचा मृत्यू झाला. त्यानंतर सातत्याने मृत्यू होणाऱयांच्या संख्येत वाढ होते आहे. हे मजूर रंगकाम करणारे, भंगार विक्री करणारे तसेच किरकोळ कामे करणारे होते.
या भागातील जंगलपट्टय़ात पसरलेल्या गावठी दारूच्या अड्डय़ांवर धाडसत्र सुरू केल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. धनंजय कुलकर्णी यांनी दिली. पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी गंभीर दखल घेत या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवला आहे. अत्यवस्थ रुग्णांचे जबाब नोंदवून घेण्यात आले आहेत. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.