धान्यापासून मद्यनिर्मितीस मान्यता; चार ‘ड्राय डे’ रद्द करण्याचा प्रस्ताव

धान्यापासून देशी मद्यनिर्मिती करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. तसेच आषाढी-कार्तिकी एकादशी, हुतात्मा दिन (३० जानेवारी) आणि दारूबंदी सप्ताहाचा शेवटचा दिवस (८ ऑक्टोबर) हे वर्षांतील चार ‘ड्राय डे’ राज्य सरकार रद्द करणार असून, तसा प्रस्ताव तयार असल्याचे उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. मात्र, याबाबतची अधिसूचना निवडणुकीनंतर जारी करण्यात येणार असल्याचे उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले.

मद्यविक्री परवाने, नियमावलीत राज्य सरकारने अनेक बदल केले आहेत. विक्रेत्यांच्या व बारमालकांच्या अडचणी सोडविण्यासाठी पावले टाकली आहेत. ‘ईज ऑफ डुइंग बिझिनेस’अंतर्गत काही निर्णय घेण्यात आले आहेत. ज्वारी, बाजरी, मका आदींपासून स्पिरिट, इथेनॉलनिर्मिती सुरू होती. आता धान्यापासून देशी मद्यनिर्मितीस मान्यता देण्यात आली असून, उत्पादन शुल्क विभागाने त्याबाबत अधिसूचना जारी केली आहे. ‘मद्यसेवन शरीरास हानीकारक आहे’ आणि ‘मद्यसेवन करून वाहन चालवू नये’ असा वैधानिक इशारा प्रत्येक मद्याच्या बाटलीच्या लेबलवर छापणे बंधनकारक करण्यात आले आहे.

बारची परवानगी असलेल्या अनेक हॉटेलमालकांचे बँक्वेट हॉलही असून तेथे पाटर्य़ा, कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामध्ये बारमधून मद्य देण्याची परवानगी नसते. ती हवी असल्यास एक दिवसाचा पार्टी परवाना घ्यावा लागतो व त्याचे शुल्क अधिक असते. त्यामुळे बारमालकांनी यासंदर्भात सरकारला विनंती केली होती. आता २५ टक्के शुल्क भरून बँक्वेट हॉलमधील कार्यक्रमातही मद्य पुरविता येऊ शकेल.

सध्या वर्षभरात नऊ ‘ड्राय डे’ असून ते कमी करण्याची मागणी मद्यविक्री दुकानदार आणि बारमालकांनी केली होती. ‘ड्राय डे’च्या आदल्या दिवशी मोठय़ा प्रमाणावर मद्यविक्री होते व ज्यांना मद्यसेवन करायचे आहे, ते ‘ड्राय डे’लाही मद्यपान करतात. त्यामुळे ‘ड्राय डे’ कमी करण्याची मागणी होती, असे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता ‘ड्राय डे’ कमी केल्यास सरकारवर टीका होईल, यासाठी त्याबाबतची अधिसूचना निवडणुकीनंतर जारी होईल, असे संबंधितांनी स्पष्ट केले.