News Flash

घातक मांजाचा वापर सुरूच

मुंबईतील बाई साखराबाई प्राणी रुग्णालयात मकरसंक्रांतीपूर्वीच जखमी पक्षी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.

मकरसंक्रांतीच्या आदल्याच दिवशी ५०हून अधिक पक्षी जखमी

पतंग उडविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नायलॉन मांजावर बंदी घालण्यात आली असली तरी या घातक मांजाचा वापर अद्याप थांबलेला नाही. त्यामुळे मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवसापर्यंत ५० हून अधिक पक्षी मांजामुळे जबर जखमी झाल्याचे समोर आले आहे.

मकर संक्रांतीनिमित्त पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या घातक नायलॉन मांजामुळे पक्ष्यांबरोबरच व्यक्तीही जखमी होतात. त्यामुळे या मांजाच्या वापरावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. मुंबई पोलिसांनीही या मांजाचा वापर टाळण्याची ताकीद देणारी सूचना जारी केली होती. तरी देखील या मांजाचा वापर न थांबल्याने पक्षी जखमी होत आहेत. मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवसापर्यंत मुंबईतील प्राणी रुग्णालयांमध्ये ५० हून अधिक जखमी पक्षी दाखल झाले आहेत. मांजामुळे पंख व मानेला जखम झाल्याने या पक्ष्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पतंगांच्या मांजामुळे पक्ष्यांचा आणि पतंग विजेच्या तारांना स्पर्श करून गेल्यामुळे विजेचा धक्का लागून मुलांचा मृत्यू झाल्याच्या घटना अनेकदा घडतात. त्यामुळे राज्य शासनाने या मांजावर बंदी घातली होती. तसेच मकरसंक्रांतीच्या काळात हा मांजा जवळ बाळगल्यास अथवा त्याची विक्री केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करणार असल्याचे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले होते. मात्र तरीही या मांजाचा वापर होत आहे.

मुंबईतील बाई साखराबाई प्राणी रुग्णालयात मकरसंक्रांतीपूर्वीच जखमी पक्षी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. यात आतापर्यंत २२ कबुतरे, ७ घारी, ३ घुबडे, १ पोपट आणि १ कोकीळ या पक्ष्यांचा समावेश आहे. याबाबत रुग्णालयाचे लेफ्टनंट कर्नल डॉ. जे. सी. खन्ना म्हणाले की, ‘मकरसंक्रांतीनिमित्त साधा दोरा वापरण्याचे आवाहन अनेकदा करूनही नागरिक मांजाचा वापर करतात. त्यामुळे पक्षी जखमी होण्याच्या घटना वारंवार होत आहेत.’ तर, ‘रॉ’चे पवन शर्मा म्हणाले की, गेल्या आठवडाभरात आमच्याकडे १०-१२ जखमी कबुतरे आली आहेत. मुंबई पोलीस व शासनाचे आवाहन धुडकावून लावत मांजाचा वापर सुरूच ठेवल्याचे दिसते आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2017 12:36 am

Web Title: continued use of of harmful manja
Next Stories
1 मुंबईकरांची ‘वायफाय’शी नाळ तुटलेलीच
2 विधानसभा आश्वासन समितीच्या बैठकांना सचिवांच्या दांडय़ा
3 मुंबई बडी बांका : पंडित शाळा
Just Now!
X