सातत्याने निर्जंतुकीकरण, पुरेसे पाणी व साबणाची व्यवस्था; महापालिकेकडून उपाययोजनांवर भर

इंद्रायणी नार्वेकर, लोकसत्ता

मुंबई : करोनामुळे जगात इतर बदल होवो न होवो मुंबईतील सार्वजनिक शौचालय व्यवस्था मात्र कात टाकू  लागली आहे. करोनाच्या या दीर्घ लढाईत मुंबईतील काही ठिकाणच्या शौचालयांमध्ये स्वच्छतेचे भान आले असून वरचेवर निर्जंतुकीकरण, पुरेसे पाणी आणि साबणासह हात धुण्याची व्यवस्था शौचालयांमध्ये होत आहे.

मुंबईतील ६० टक्के लोक झोपडपट्टीत राहतात आणि सार्वजनिक शौचालयाचा वापर करतात. करोनाचा संसर्ग फैलावण्याचा धोका सर्वात जास्त इथेच आहे. त्यामुळे येत्या काळात या सार्वजनिक शौचालयांमधील व्यवस्था बदलावी लागणार आहे. काही ठरावीक ठिकाणी याची सुरुवातही झाली आहे. झोपडपट्टय़ांमध्ये सुरुवातीला मोठय़ा प्रमाणावर रुग्ण आढळले, तेव्हा शौचालयाच्या सार्वजनिक वापरामुळे संक्रमण वाढत असल्याचे लक्षात आले होते. त्यामुळे या शौचालयांचे वारंवार निर्जंतुकीकरण करून घेतले जात होते. मात्र दर काही तासांनी निर्जंतुकीकरण करण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर मनुष्यबळ लागते. त्यावर तोडगा काढावा लागणार आहे.

वरळी, प्रभादेवी परिसरांत आता रुग्णसंख्या बऱ्यापैकी आटोक्यात आली आहे. त्यामुळे येथे पालिकेने आता प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्याचे ठरवले आहे. चाळी, बैठय़ा घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या शौचालयांमध्ये आणि सार्वजनिक नळाच्या ठिकाणी निर्जंतुकीकरण आपोआप कसे होईल याकरिता नवनवीन कल्पना अमलात आणल्या जात आहेत. वरळी कोळीवाडा येथील सार्वजनिक शौचालयात निर्जंतुकीकरणाची स्वयंचलित यंत्रणा उभारण्यात आली आहे. त्यातून दर अर्ध्या तासाने आपोआप निर्जंतुक द्रावणाची फवारणी होत असल्याची माहिती साहाय्यक आयुक्त शरद उघडे यांनी दिली.

कुर्ला पश्चिमेकडील तकियावाड परिसरात सार्वजनिक शौचालयाच्या बाहेर हात धुण्यासाठी पाण्याचे पिंप ठेवण्यात आले आहेत. तसेच हात धुण्याकरिता बेसिन व साबणाची सोय करण्यात आली आहे. स्थानिक नगरसेविका सईदा खान यांनी येथील नागरिकांना ही सोय करून दिली आहे. तर वडाळा येथे पालिकेच्या एफ उत्तर विभागाने शौचालयांच्या बाहेर हात धुण्यासाठी साबणाच्या द्रावणाची सोय केली आहे.

मुंबईच्या झोपडपट्टय़ांमधील सार्वजनिक शौचालये म्हणजे अक्षरश: घाणीचे साम्राज्य. या ठिकाणी पाणी, वीज यांची सोय नसते हे आतापर्यंत गृहीतच धरलेले आहे. मात्र करोनाच्या निमित्ताने यंत्रणेला आणि रहिवाशांना स्वच्छतेचे भान आल्याचे दिसून येत आहे.