News Flash

कंत्राटी निवेदकांमुळे धोका

मध्य रेल्वेवर सध्या निवेदकांची २६ पदे रिक्त असून २८ स्थानकांतील ५६ निवेदक हे कंत्राटी पद्धतीवर कामाला आहेत. रिक्त २६ पदे

| April 7, 2014 05:44 am

मध्य रेल्वेवर सध्या निवेदकांची २६ पदे रिक्त असून २८ स्थानकांतील ५६ निवेदक हे कंत्राटी पद्धतीवर कामाला आहेत. रिक्त २६ पदे आणि कंत्राटी पद्धतीवरील निवेदक यांमुळे मध्य रेल्वेला भविष्यात धोका असल्याचे रेल्वेतीलच काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. रेल्वेच्या वेळापत्रकात अचानक काही बदल झाल्यास किंवा आणीबाणीच्या परिस्थितीत रेल्वेतर्फे प्रवाशांना सूचना व माहिती देण्याचे काम निवेदक करतात. या कामात काही चूक झाल्यास कंत्राटी निवेदकांवर रेल्वे कोणतीही जबाबदारी टाकून कारवाई करू शकत नाही. तसेच कंत्राटी निवेदकांचे प्रशिक्षण रेल्वेमार्फत झाले नसल्याने येत्या काळात प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. मात्र रेल्वे प्रशासनातर्फे अशी कोणतीही शक्यता फेटाळली जात आहे.
गेल्या आठवडय़ात मुंब्रा येथे संतप्त प्रवाशांनी रेल रोको केल्याने मध्य रेल्वेची सेवा काही काळासाठी विस्कळीत झाली होती. मध्य रेल्वेच्या काही उपनगरीय सेवा रद्द होऊनही त्याबाबत कोणतीही उद्घोषणा न झाल्याने प्रवासी संतप्त झाले व त्यांनी हा रेल रोको केल्याचे समोर आले होते. रेल्वेच्या वेळापत्रकात अचानक काही बदल झाल्यास, एखाद-दुसरी सेवा रद्द झाल्यास निवेदक त्याबाबत प्रवाशांना माहिती देतात. तसेच काही तांत्रिक बिघाडामुळे रेल्वेसेवा विस्कळीत झाल्यास तशी उद्घोषणा करतात. मात्र मुंब्रा स्थानकातील निवेदक हा कंत्राटी पद्धतीवर असल्याने त्याला या सर्व गोष्टींचे योग्य ज्ञान नव्हते. त्यातूनच हा गोंधळ झाल्याची माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली. हा निवेदक कंत्राटी पद्धतीवर असल्याने त्याच्यावर कोणतीही कारवाई होऊ शकत नाही.

कंत्राटी पद्धतीला एनआरयूएमचा कायमच विरोध आहे. या कामगारांना रेल्वेच्या कार्यपद्धतीची संपूर्ण माहिती नसते. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ शकते.
वेणू नायर, महामंत्री, एनआरयूएम

निवेदकांची कामे
*प्रत्येक स्थानकावरील प्लॅटफॉर्मवर दिसणाऱ्या इंडिकेटरवरील गाडय़ांची माहिती निवेदकच बदलतात. यासाठी असलेली ‘ट्रेन मॅनेजमेण्ट सिस्टिम’ ही केंद्रीय यंत्रणा अद्याप सर्व स्थानकांवर पोहोचलेली नाही. त्यामुळे हे काम निवेदकांकडे असते.
*गाडय़ांचे वेळापत्रक बदलले किंवा काही सेवा पुढे-मागे झाल्यास त्याबाबतची माहिती प्रवाशांना निवेदकच देतात.
*पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आणि मेगाब्लॉक असलेल्या रविवारी निवेदकांवर जास्त मोठी जबाबदारी असते. रेल्वेमार्गावर बिघाड असल्यास, सेवा विस्कळीत झाल्यास त्याची माहिती निवेदकांना प्रवाशांपर्यंत पोहोचवावी लागते.

या स्थानकांत कंत्राटी निवेदक
मस्जिद, करीरोड, शीव, कांजुरमार्ग, जुईनगर, गोवंडी, नाहूर, कोपर, ठाकुर्ली, टिटवाळा, खडवली, वाशिंद, आसनगाव, आटगाव, खर्डी, वांगणी, शेलू, नेरळ, भिवपूरी रोड, सीवूड दारावे, खारघर, मानसरोवर, खाण्डेश्वर, ऐरोली, रबाळे, घणसोली, कोपरखैरणे, तुर्भे.

निवेदकांची आकडेवारी
एकूण मान्य पदे – १९१
कायम सेवेतील निवेदक – १०९
कंत्राटी निवेदक – ५६
रिक्त पदे – २६

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2014 5:44 am

Web Title: contract announcer danger
टॅग : Danger
Next Stories
1 ‘जिवाची मुंबई’ करणाऱ्या निरीक्षकांवर निवडणूक आयोगाचा शिस्तीचा बडगा
2 भारत-श्रीलंका सामन्यावर सट्टा लावणारे अटकेत
3 मुंबईसमोर क्षयरोगाचे आव्हान!
Just Now!
X