पालिका रुग्णालयांतील शस्त्रक्रिया विभागातील कंत्राट वादात

पालिका रुग्णालयांतील शस्त्रक्रिया विभागात वापरण्यात येणाऱ्या ‘थ्री डोम ऑपरेशन लाईट’ खरेदीसाठी आवश्यक असलेले उत्पादन प्रमाणित करण्याचे प्रमाणपत्र (सीई) सादर करण्याऐवजी कंत्राटदाराने भलताच तांत्रिक अहवाल सादर करून हे कंत्राट खिशात टाकण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. याकडे पालिकेच्या अधिकाऱ्यांनीही कानाडोळा केल्याने हे दिवे बसवण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.

पालिका रुग्णालयांमधील शस्त्रक्रिया विभागात आवश्यक असणाऱ्या दिव्यांची खरेदी पालिकेच्या मध्यवर्ती खरेदी विभाग, आरोग्य खाते आणि केईएम रुग्णालयाच्या माध्यमातून केली जाते. तिन्ही विभाग रुग्णालयांच्या गरजेनुसार या दिव्यांची (थ्री डोम ऑपरेशन लाईट) खरेदी करीत असतात. काही महिन्यांपूर्वी केईएम रुग्णालयाच्या माध्यमातून ३० ‘थ्री डोम ऑपरेशन लाईट’ खरेदी करण्यासाठी निविदा मागविल्या होत्या. दिव्यांचा पुरवठा करणाऱ्या कंपनीकडे ‘सीई’ (सर्टिफिकेट युरोप-उत्पादन प्रमाणित करण्याचे प्रमाणपत्र) प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे असे बंधन निविदेमध्ये घालण्यात आले होते. रुग्णालयाला लागणारी उत्पादने प्रमाणित केल्यानंतर संबंधित यंत्रणांकडून सीई प्रमाणपत्र दिले जाते.

निविदा प्रक्रियेअंती पालिकेने एका कंत्राटदाराला हे कंत्राट देण्यावर शिक्कामोर्तब केले. परंतु या कंत्राटदाराने सीई प्रमाणपत्राऐवजी ‘एसझेडयू टेस्ट’ या युरोपियन यंत्रणेने दिलेला ‘तांत्रिक कागदपत्रांचा आढावा अहवाल’

(टेक्निकल डॉक्युमेन्टेशन रिव्ह्य़ू रिपोर्ट) पालिकेला सादर केला. या अहवालाच्या आधारे पालिका अधिकाऱ्यांनी या कंत्राटदाराला हे काम देण्याचा निर्णय घेतला. या कंत्राटदाराने सीई प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे निविदेमधील अटी आणि शर्तीचे उल्लंघन झाल्याचे पालिका अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देण्यात आले. मात्र तरीही संबंधित कंत्राटदाराच्या खिशात कंत्राट टाकण्याच्या हालचाली पालिकेत सुरू झाल्या आहेत.‘थ्री डोम ऑपरेशन लाईट’ खरेदीमध्ये घोटाळा होत असल्याचे लक्षात आल्यानंतर या क्षेत्रातील सल्लागार असलेले रमेश नाईक यांनी या संदर्भात युरोपियन कमिशनशी संपर्क साधून कंत्राटदाराने सादर केलेल्या सीई प्रमाणपत्राबाबत विचारणा केली होती. आश्चर्याची बाब म्हणजे कंत्राटदाराने ज्या यंत्रणेने सीई प्रमाणपत्र दिल्याचा दावा केला, त्या यंत्रणेने हे प्रमाणपत्र दिलेले नाही हे नाईक यांनी केलेल्या पत्रव्यवहारानंतर स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांनी तात्काळ ही बाब खरेदी अधिकाऱ्यांच्या कानावरही घातली.

अन्यत्रही कंत्राटदाराला झुकते माप?

एका ‘थ्री डोम ऑपरेशन लाईट’ची किंमत सुमारे ७ लाख १५ हजार ४२१ रुपये आहे. या दरानुसार केईएम रुग्णालयातील ३० लाईट पुरविण्याचे कंत्राट कंत्राटदाराला देण्यात येणार आहे. इतकेच नव्हे तर पालिकेच्या मध्यवर्ती खरेदी खात्यामार्फत रुग्णालयांतील शस्त्रक्रिया विभागासाठी आणखी २० दिवे खरेदी करण्यात येणार आहेत. या २० दिव्यांच्या खरेदीसाठी निविदा मागविण्याऐवजी हे कंत्राट याच कंत्राटदाराला देण्याचे पालिकेत घाटत आहे. त्याशिवाय पालिकेच्या आरोग्य खात्यातर्फे आणखी आठ दिवे खरेदी करण्यात येणार असल्याचे समजते.

‘थ्री डोम ऑपरेशन लाईट’ खरेदीबाबत कंत्राटदाराने सादर केलेली कागदपत्रे तज्ज्ञ मंडळींकडून पडताळून घेण्यात येतील.

– डॉ. अविनाश सुपे, संचालक, वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये