महापालिकेच्या निर्णयावर कामगार संघटनांचा संताप

मुंबई : करोनाबाधित किंवा संशयित रुग्णांशी संबंधित कचरा गोळा करण्यासाठी पालिकेने प्रत्येक वॉर्डात विशेष यंत्रणा सुरू केली आहे. प्रतिबंधित इमारतीतील कचरा गोळा करण्यासाठी कंत्राटी कामगारांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र या कामगारांना एकच पीपीई पोशाख देण्यात आला असून तोच धुऊन वापरण्यात आला असल्यामुळे कामगार संघटनांमध्ये संताप आहे.

करोनाबाधितांमुळे किंवा संशयित रुग्णामुळे जो जैविक कचरा निर्माण होत आहे. त्याच्या विल्हेवाटीसाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने एक नियमावली तयार केली आहे. हा कचरा स्वतंत्रपणे गोळा करणे व तो शास्त्रीय पद्धतीने जाळून त्याची विल्हेवाट लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे मुंबईत ज्या ठिकाणी करोनाचा रुग्ण सापडल्यामुळे इमारती प्रतिबंधित करण्यात आल्या आहेत अशा इमारतीतील कचरा व मास्क, ग्लोव्हज असा जैविक कचरा गोळा करण्यासाठी पालिकेच्या घनकचरा विभागाने यंत्रणा उभारली आहे. या इमारतीतील नागरिकांनी बाहेर कुठेही कचरा टाकू नये अशा सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत.

हा कचरा गोळा करणाऱ्या कामगारांना स्वसंरक्षणार्थ पीपीई पोशाख देण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रतिबंधित इमारतीतील कचरा पिवळ्या पिशवीत

मुंबईत सध्या २२६ प्रतिबंधित इमारती व वसाहती असून तेथील कचरा गोळा करण्यासाठी प्रत्येक वॉर्डसाठी दोन गाडय़ा देण्यात आल्या आहेत. तसेच हा कचरा गोळा करण्यासाठी पिवळ्या व काळ्या रंगाच्या पिशव्या देण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. देवनार येथे जैव वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावणारी एसएमएस ही कंपनी असून तिथे ग्लोव्हज, मास्क हा कचरा पाठवला जात असल्याची माहिती उपयुक्त अशोक खैरे यांनी दिली. तर काळ्या रंगाच्या पिशवीत या इमारतीतील बाकीचा कचरा गोळा केला जात असून तो देखील देवनार येथे मोठा खड्डा खणून त्यात पुरला जात आहे.

‘कामगारांच्या जिवाशी खेळ’

प्रतिबंधित इमारतीत कचरा गोळा करण्याची जबाबदारी कंत्राटी कामगारांवर देण्यात आली आहे. ज्या इमारतीत कोणालाही जायला परवानगी नाही अशा इमारतीतील जैविक कचरा उचलण्याचे काम या कामगारांना दिले जात आहे. मात्र कंत्राटी कामगारांना कोणतेही विमा कवच नाही मग त्याची निवड या कामासाठी का केली, असा सवाल कचरा वाहतूक श्रमिक संघाचे मिलिंद रानडे यांनी केला आहे.

ड्रेस धुऊन वापरा!

कामगाराना एकच ड्रेस दिला असून तो कसा घालायचा आणि कसा काढायचा याचे प्रशिक्षण त्यांना दिलेले नाही. तसेच अडीच हजार किमतीचा हा ड्रेस असल्यामुळे तोच ड्रेस रोज धुऊन वापरण्याचे तोंडी आदेश दिल्याचा आरोप कचरा वाहतूक श्रमिक संघाचे मिलिंद रानडे यांनी केला आहे. कामगार हा ड्रेस घरी घेऊन गेले तर तर त्यांच्या घरातही हा संसर्ग होण्याचा धोका आहे, असेही त्यांनी सूचित केले आहे.