मुंबई महापालिकेच्या विविध प्रकल्पांच्या, तसेच पुनर्विकासात अडथळा बनणारी झाडे वृक्ष प्राधिकरण समितीच्या मंजुरीअंती कापण्यात येत असून या लाकडांचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. पालिकेने वृक्षतोडीसाठी नियुक्त केलेले कंत्राटदार छाटणी, तोडणीनंतर ही लाकडे हिंदू स्मशानभूमीत लाकडांचा पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराला विकत असून पालिकेला यासाठी दुहेरी खर्च करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आला. मात्र यावर प्रशासनाला कोणतेच उत्तर देता आले नाही.

दरवर्षी पावसाळ्यापूर्वी रस्त्यांवरील वृक्षांची, फांद्यांची छाटणी करण्यात येते. त्याचबरोबर धोकादायक वृक्ष तोडून टाकण्यात येतात. या कामासाठी पालिकेने कंत्राटदाराची नेमणूक केली आहे. खासगी भूखंडावरील अस्ताव्यस्त पसरलेल्या वृक्षांचीही मालकाच्या मागणीनुसार छाटणी करून देण्यात येते. याच कंत्राटदाराला ही कामे दिली जातात. त्याचबरोबर मुंबईमध्ये अनेक पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत. सागरी किनारा मार्ग, मेट्रो, रस्ता आणि नाल्यांचे रुंदीकरण आदींचा त्यात समावेश आहे. या विकासकामांच्या मार्गात येणारे वृक्ष हटवावे लागतात. तसेच मुंबईत मोठय़ा प्रमाणावर पुनर्विकासाची कामे सुरू असून त्यात अडथळा बनणारे तोडले जातात. विकासकामे आणि पुनर्विकासात अडथळा बनलेले वृक्ष पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या मंजुरीने तोडले किंवा छाटले जातात. दरवर्षी काही हजार वृक्षांची कत्तल वा छाटणी होत असते. मात्र आता या लाकडांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

मुंबईमधील पालिकेच्या आणि खासगी स्मशानभूमींमध्ये मृतदेह दहनासाठी जळाऊ लाकडांचा मोफत पुरवठा करण्यात येतो. खासगी आणि पालिकेच्या मिळून ५४ स्मशानभूमींना जळाऊ लाकडांचा पुरवठा करण्यासाठी प्रशासनाने निविदा मागविल्या होत्या. पालिकेच्या स्मशानभूमीला ८२५ प्रति क्विंटल, तर खासगी स्मशानभूमीला ८६५ रुपये प्रति क्विंटल दराने लाकडाचा पुरवठा करण्याचे ३५ कोटी ७४ लाख नऊ हजार रुपयांचे कंत्राट देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून त्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या शुक्रवारच्या बैठकीत सादर करण्यात आला होता. या प्रस्तावावरून नगरसेवकांनी प्रशासनावर ताशेरे ओढले.

पावसाळापूर्व वृक्षतोड, फांद्यांची छाटणी, विकासाआड येणारे वृक्ष हटविल्यानंतर त्यांची लाकडे जातात कुठे? या कामांसाठी नियुक्त कंत्राटदार ही लाकडे स्मशानात लाकडांचा पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराला विकत असल्याचा आरोप भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी बैठकीत केला. हा कंत्राटदार दुहेरी कमाई करीत आहे. पालिकेला मात्र वृक्षतोड आणि स्मशानभूमीला लाकडांचा पुरवठा अशा दोन्ही कामांसाठी खर्च सोसावा लागत आहे, अशी टीका त्यांनी केली. प्रशासनाला या संदर्भात समाधानकारक उत्तर देता आले नाही.

भाताच्या तुसाच्या ठोकळ्यांचा विचार

नागपूरमधील हिंदू स्मशानभूमीत मृतदेह दहनासाठी भाताच्या तुसापासून तयार केलेल्या ठोकळ्यांचा वापर करण्यात येतो. लाकडाच्या तुलनेत या ठोकळ्यांची किंमत कमी आहे. त्यामुळे मुंबईतील हिंदू स्मशानभूमीतही त्याचा वापर करावा, अशी मागणी सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी केली. याबाबत अभ्यास करून तुसाच्या ठोकळ्यांचा विचार करता येईल, असे उत्तर प्रशासनाच्या वतीने देण्यात आले.