वारंवार निविदा मागवूनही बांधकामासाठी ठेकेदार नियुक्ती नाही; लाखो प्रवाशांचे हाल सुरूच

मुंबई : मुंबई-ठाण्याचा दुवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि सततच्या वाहतूक कोंडीमुळे लाखो प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या कोपरी उड्डाणपुलाची अवस्था ‘रखडकथा संपता संपेना’ अशी झाली आहे. या पुलाचे काम करण्यासाठी वारंवार निविदा मागवूनही मध्य रेल्वेला ठेकेदारच मिळेनासा झाल्याने या प्रकल्पाचे काम रखडण्याची आणि लाखो प्रवाशांना आणखी मनस्ताप सोसावा लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

गेल्या काही वर्षांपासून केवळ कागदावरच विकासाच्या भराऱ्या मारणाऱ्या कोपरी रेल्वे उड्डाणपुलाचा खर्च नऊ  कोटींवरून आता तब्बल २५८ कोटींच्या घरात गेला आहे. या प्रकल्पाची उभारणी करून लाखो प्रवाशांना दिलासा देण्याची जबाबदारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) घेतली असून त्यासाठी पुरेसा निधीही उपलब्ध करून दिला असला तरी या प्रकल्पाचे नष्टचर्य काही संपलेले नाही. त्यामुळे मुंबई-ठाणेकरांचा वाहतूक कोंडीचा त्रास कायमच राहणार आहे.

मुंबई-नाशिक महामार्गावरील कोपरी रेल्वे उड्डाणपुलावरून दररोज हजारो वाहनांची वर्दळ असते. हा महामार्ग दोन्ही बाजूस चार पदरी असला तरी पुलावर दुपदरी असल्याने या भागात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. केवळ ६२ मीटरचे हे अंतर पार करण्यासाठी अर्धा तास वेळ वाया घालवावा लागतो.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात या पुलाच्या रुंदीकरणाचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी नऊ  कोटी रुपये मंजूर करण्यात आले. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने सन २००१ मध्ये प्रकल्पाचा आराखडा मान्यतेसाठी रेल्वेस सादर केला. मात्र रेल्वेची आडमुठी भूमिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची अनास्था यामुळे त्यात काहीच प्रगती झाली नाही.

अखेर भाजप-शिवसेनेने सन २०१५ मध्ये या उड्डाणपूल उभारण्याची जबाबदारी एमएमआरडीएवर टाकली. त्यानुसार प्राधिकरणाने २५८ कोटी रुपये खर्च करून या पुलाचे आठ पदरी विस्तारीकरण करण्यात येणार आहे. सध्याच्या दुपदरी पुलाच्या दोन्ही बाजूस दोन-दोन मार्गिकांचे पूल बांधण्यात येणार आहेत. त्यानंतर सध्याचा उड्डाणपूल पाडून तेथे चार मार्गिकांचा नवा पूल बांधण्यात येणार आहे. रेल्वे मार्गावरील मुख्य ६२ मीटर पुलाची उभारणी रेल्वे करणार असून दोन्ही बाजूचे जोड रस्ते एमएमआरडीए करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुलाचे २१ मे रोजी भूमिपूजनही करण्यात आले. मात्र मुख्य पुलाच्या उभारणीसाठी रेल्वेने दोन वेळा निविदा काढूनही कोणीच ठेकेदार काम करण्यासाठी पुढे आलेला नाही. आता तिसऱ्या वेळीही केवळ एकच निविदा आली आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे काम आणखी काही काळ पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

याबाबत एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, कोपरी पुलाचे काम लवकर व्हावे यासाठी प्राधिकरण प्रयत्नशील आहे. पुलाच्या ज्या भागाचे काम रेल्वे करणार आहे, त्यासाठी ९० कोटी रुपयांचा खर्च येणार असून त्यापैकी २३ कोटी रुपये रेल्वेला देण्यातही आले आहेत.

पहिल्या दोन टप्प्यांत प्रतिसाद मिळाला नसला तरी तिसऱ्या टप्प्यात निविदा आल्या असून त्याप्रमाणे रेल्वे कार्यवाही करून लवकर काम सुरू करेल अशी अपेक्षा आहे. जोड रस्त्यांचे काम एमएमआरडीएने सुरू केल्याचेही त्यांनी सांगितले.

रेल्वेने मागविलेल्या निविदेला सुरुवातीस प्रतिसाद मिळाला नव्हता मात्र आता एक निविदा आली असून त्याची तांत्रिक छाननी सुरू आहे. तांत्रिक छाननीत ही कंपनी पात्र ठरल्यास वित्तीय निविदेची छाननी केली जाईल. यात ही कंपनी पात्र ठरल्यास त्यांना काम देऊन ऑक्टोबर महिन्यात प्रत्यक्ष काम सुरू करण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे.

-सुनील उदासी, मुख्य जनसंपर्क अधिकारी,मध्य रेल्वे