* कंत्राटदारांची महापालिकेकडे अधिक दराची मागणी
* रस्त्यांच्या कामांबाबत मात्र महापौर समाधानी
शहरांच्या रस्त्यांची दुरुस्ती कामे पाहून महापौरांनी समाधान व्यक्त केले असले तरी कंत्राटदारांचा मात्र त्यांच्यावर विश्वास नाही. त्यामुळे खड्डे बुजवण्यासाठी कंत्राटदारांनी पालिकेने ठरवलेल्या किमतीपेक्षा आठ ते ८१ टक्के अधिक दरांची मागणी केली आहे. एकीकडे जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडची दुरुस्ती करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावरील तंत्रज्ञान वापरले जात असतानाच मुंबईतील सात क्षेत्रांपैकी दक्षिण-मध्य मुंबईतील खड्डे बुजवण्यासाठी १८१ टक्के रकमेची बोली लावण्यात आली आहे.
मुंबईतील सुमारे साडेतीनशे रस्त्यावर आजमितीला काम सुरू आहेत. गेल्या वर्षीचा खड्डय़ांचा अनुभव व येऊ घातलेली विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून पालिकेने या वेळी रस्तेदुरुस्ती मनावर घेतली आहे. शुक्रवारी मध्यरात्री महापौरांनी शहरातील प्रमुख रस्त्यांची पाहणी केली. मरिन लाइन्स, ब्रीच कॅण्डी, शीव-तुर्भे रस्ता, जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड आणि चार बंगला, अंधेरी येथील रस्त्यांचे काम पाहून समाधान व्यक्त केले. मात्र पालिकेसाठी काम करणाऱ्या कंत्राटदारांना रस्त्यांची खात्री वाटत नाही.
गेल्या वर्षी रस्त्यांची झालेली चाळण, खड्डे बुजवण्यासाठी अपुरे पडलेले कंत्राटदार व त्यासाठी त्यांना झालेला दंड व मानहानी याची पाश्र्वभूमी लक्षात घेत या वर्षी पालिकेच्या निविदेला फारसा प्रतिसाद आलेला नाही. त्यातच पालिकेने या वर्षी रस्त्यांची स्थिती उत्तम असेल असे लक्षात घेऊन शहराच्या सात क्षेत्रांपैकी प्रत्येक क्षेत्रासाठी निधीची तरतूद आठ कोटी रुपयांवरून चार कोटी रुपयांवर आणली. मात्र शहराच्या सर्व सात क्षेत्रांमध्ये कंत्राटदारांनी चार कोटी रुपयांपेक्षा अधिकची बोली
लावली आहे.
दक्षिण व दक्षिण मध्य भागासाठी प्रत्येकी फक्त एका कंत्राटदाराने स्वारस्य दाखवले असून दक्षिण मध्य मुंबईसाठी चार कोटींऐवजी ११ कोटी रुपयांची निविदा भरण्यात आली आहे. इतर पाच क्षेत्रांसाठी प्रत्येकी तीन कंत्राटदारांनी निविदा भरल्या असून तेथेही ९ ते
५० टक्के अधिक किमती भरण्यात आल्या आहेत.