नालेसफाईत कंत्राटदार आणि पालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताचे पितळ उघडे पडले असले तरी नाल्यांच्या सफाईसाठी मागविण्यात आलेल्या निविदांमध्ये कंत्राटदारांनी अडथळा निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. परिणामी नालेसफाईच्या ५२ कामांच्या निविदा मागविल्यानंतर केवळ २५ कामांनाच कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळू शकला आहे. इतकेच नव्हे तर निविदा मागविण्यापूर्वी आयोजित बैठकीत कुणी उपस्थित राहू नये याचीही काळजी कंत्राटदारांकडून घेण्यात आली होती. पालिकेत गेली अनेक वर्षे मक्तेदार बनलेले कंत्राटदार घोटाळ्यातून आपली सुटका करून घेण्यासाठी प्रशासनावर दबावतंत्राचा अवलंब करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.
पावसाळ्यापूर्वी नाल्यांतून किती गाळ काढला, तो कुठे टाकला याबाबत सुरुवातीपासून संशयाचे वातावरण होते. नालेसफाईच्या कामांबाबत झालेल्या चौकशीअंती गाळ टाकण्यासाठी दुचाकी वाहनांचा वापरही करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. तसेच एकच गाडी दोन कंत्राटांमध्ये एकाच वेळी धावताना पालिका दफ्तरी नोंद झाली आहे. यामुळे गाळ टाकण्याच्या कामात घोटाळा झाल्याचे सिद्ध झाल्यानंतर काही पालिका अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली. आता कंत्राटदारांवर कारवाईचा बडगा उगारण्याची वेळ आली आहे.
नालेसफाई घोटाळा उघडकीस आल्यानंतर या कामाची कंत्राटे रद्द करण्यात आली. परिणामी नाल्यांच्या सफाईचे घोंगडे भिजत पडले आहे. ही कामे वेळीच व्हावी आणि पावसाळ्यात नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून पालिका आयुक्त अजय मेहता यांनी नालेसफाईच्या कामांसाठी निविदा मागविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ५२ कामांसाठी निविदा मागविण्याचा निर्णय घेण्यात आला. निविदा प्रसिद्ध झाल्यानंतर कंत्राटदारांना कामाचे स्वरूप आणि अटी-शर्ती समजावून देण्यासाठी, तसेच त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी एक बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र काही कंत्राटदारांनी ही बैठक यशस्वी होऊ नये यासाठी जोरदार प्रयत्न केले. कंत्राटदार त्यात यशस्वी ठरले आणि बैठकीला फारशी मंडळी आलीच नाहीत. मात्र कंत्राटदारांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी प्रशासनाने ५२ कामांसाठी निविदा मागविल्या. परंतु केवळ २५ कामांसाठीच पालिकेला प्रतिसाद मिळाला. या कामांच्या वाणिज्य निविदा अद्याप उघडण्यात आलेल्या नाहीत. असे असतानाही कंत्राटदारांनी आता या कामांबाबत वावडय़ा उठविण्यास सुरुवात केली आहे. परिणामी, पालिका प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे.

नालेसफाईमध्ये पारदर्शकता असलीच पाहिजे. करदात्या मुंबईकरांनी कररूपात पालिकेच्या तिजोरीत जमा केलेल्या कोटय़वधी रुपयांचा नालेसफाईच्या नावाखाली चुराडा केला. आता हेच कंत्राटदार कंपन्यांची नावे बदलून पुन्हा कामे मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांची ही मक्तेदारी मोडून काढायलाच हवी. प्रशासनाने योग्य दखल घेत भ्रष्ट कंत्राटदारांना पालिकेचे दरवाजे कायमचे बंद करावेत.
देवेंद्र आंबेरकर,
विरोधी पक्षनेता

नालेसफाईच्या कामांमध्ये मोडता घालून घोटाळ्यात अडकलेल्या कंत्राटदारांनी आपली कातडी वाचविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तो कदापि सहन केला जाणार नाही. नालेसफाई पारदर्शक पद्धतीने झालीच पाहिजे. अन्यथा कंत्राटदारांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी मनसेला रस्त्यावर उतरावे लागेल.
संदीप देशपांडे,
गटनेता, मनसे