25 March 2019

News Flash

कंत्राटदारांना कोटय़वधींची खिरापत!

प्रभागांमध्ये नागरी कामे करण्यासाठी नगरसेवकांना प्रशासनाकडून नगरसेवक निधी दिला जातो.

(संग्रहित छायाचित्र)

मर्यादा धुडकावून कामांचे वाटप; कामे रखडण्याचीही शक्यता

कंत्राटदारांना नगरसेवक निधीतून कामे देण्यासाठी प्रशासनाने आखून दिलेली श्रेणीनुरूप मर्यादा धुडकावून लावत पालिका अधिकाऱ्यांनी कोटय़वधी रुपयांची कामे कंत्राटदारांच्या खिशात घातल्याचे उघड झाले आहे. ही बाब उघडकीस आल्यानंतर पालिकेच्या एफ उत्तर विभागाने संबंधित कंत्राटदाराला मिळालेली कामे दुसऱ्या क्रमांकावरील कंत्राटदाराला दिली. मात्र एफ दक्षिण विभागातील अधिकाऱ्यांनी या प्रकरणात दिरंगाई केल्याने कंत्राटदाराने स्थगिती आदेश मिळवले. याचा परिणाम असा झाला की, या गुंतागुंतीमुळे आता एफ दक्षिण विभागाच्या हद्दीतील अडीच कोटींची कामे रखडली आहेत.

प्रभागांमध्ये नागरी कामे करण्यासाठी नगरसेवकांना प्रशासनाकडून नगरसेवक निधी दिला जातो. नगरसेवकांच्या शिफारशीनुसार या निधीमधून छोटी-मोठी नागरी कामे केली जातात. पूर्वी प्रभागांतील किरकोळ कामे करण्यासाठी कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्यांच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यामुळे प्रशासनाने ई-निविदा पद्धतीचा अवलंब करतानाच नगरसेवक निधीतून कामे करणाऱ्या कंत्राटदारावर दोन कोटी, पाच कोटीपर्यंतच्या कामांचे श्रेणीनिहाय बंधन घातले होते. मात्र काही कंत्राटदारांनी पालिकेच्या विविध विभाग कार्यालयांतून कोटय़वधीची कामे पदरात पाडून घेतली. श्रेणीनिहाय आखून दिलेल्या मर्यादेवर लक्ष ठेवण्यासाठी यंत्रणाच नसल्याने कंत्राटदारांचे फावले.

एका कंत्राटदाराला मर्यादेपेक्षा अधिक कामे देण्यात आल्याचे एफ-दक्षिण आणि एफ-उत्तर प्रभाग समितीचे अध्यक्ष सचिन पडवळ यांच्या निदर्शनास आले. याबाबत सचिन पडवळ यांनी प्रशासनाकडे तक्रार केली. त्यानंतर एफ-उत्तर विभागाने पालिकेच्या दक्षता विभागाचा अभिप्राय मागविला होता. मात्र दक्षता विभागाने एफ-उत्तर विभागालाच निर्णय घेण्याची सूचना केली. त्यानुसार एफ-उत्तर विभागाने संबंधित कंत्राटदाराऐवजी दुसऱ्या क्रमांकाचे लघुत्तम दर असलेल्या कंत्राटदाराला कामे दिली.

दरम्यानच्या काळात कंत्राटदाराने आपली नोंदणी दुसऱ्या श्रेणीत करून घेतली. त्यामुळे या कंत्राटदाराला पाच कोटी रुपयांपर्यंत कामे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र एफ-दक्षिण विभाग कार्यालयाकडून या कंत्राटदाराला देण्यात आलेल्या कामांची मर्यादा पाच कोटी रुपयांच्या वर गेल्याचे लक्षात आले. या विभाग कार्यालयाकडून कारवाई होण्यापूर्वीच संबंधित कंत्राटदाराने याप्रकरणी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने या प्रकरणाला स्थगिती आदेश दिला आहे. त्यामुळे आता एफ-दक्षिण विभाग कार्यालयाच्या हद्दीतील २.५ कोटी रुपयांची ५२ कामे रखडण्याची चिन्हे आहेत.

कंत्राटदाराच्या श्रेणीनुसार त्याला कामे दिली जातात. काही कंत्राटदारांना दोन कोटी रुपये, तर काही कंत्राटदारांना पाच कोटी रुपयांची मर्यादा प्रशासनाने घातले आहे. प्रशासनाने कंत्राटदाराच्या क्षमतेनुसार त्याला देण्यात येणाऱ्या कामांवर मर्यादा घातली, पण प्रत्यक्षात कंत्राटदाराला किती कामे दिली जातात यावर लक्ष ठेवणारी यंत्रणाच पालिकेत नाही.

सचिन पडवळ, अध्यक्ष, एफ-दक्षिण, एफ-उत्तर प्रभाग समिती

First Published on March 9, 2018 3:33 am

Web Title: contractors work issue bmc pending work