उत्सवांच्या काळात ध्वनिक्षेपक, डीजे यांच्या मोठय़ा आवाजाने रहिवासी त्रस्त होतात. उत्सव मंडळांविरोधात तक्रारी केली तरी प्रशासन मात्र त्यांच्यावर कारवाई करत नाही. मात्र आता ठाणे महापालिकेने या अतिउत्साही मंडळांच्या मुसक्या आवळण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे दहीहंडी तसेच गणेशोत्सव साजरा करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांना ध्वनिक्षेपकाची ठरावीक आवाजाची मर्यादा ओलांडता येणार नाही. ध्वनिक्षेपकांवर आवाज नियंत्रण उपकरण बसविण्याचे स्पष्ट आदेश ठाणे पोलिसांनी शुक्रवारी ध्वनिक्षेपक ठेकेदारांना दिले आहेत.
शहरातील उत्सवांमध्ये मोठय़ा प्रमाणात डीजेचा वापर करण्यात येत असून त्यामध्ये आयोजक सर्वच नियम धाब्यावर बसवून मोठय़ा प्रमाणावर ध्वनिप्रदूषण करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळते. दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव या सणांमध्ये मोठय़ा प्रमाणात डीजेचा वापर करून ध्वनिप्रदूषण करण्यात येते. अशा उत्सवांच्या आयोजनात राजकीय नेत्यांचा मोठय़ा प्रमाणात सहभाग दिसून येतो. या उत्सवांत दिवसेंदिवस आवाजाची पातळी वाढत असतानाही पोलिसांकडून कोणतीच कारवाई करण्यात येत नसल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते दरवर्षी नाराजी व्यक्त करीत असतात.
याच पाश्र्वभूमीवर ठाण्याचे सहपोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांनी शुक्रवारी दुपारी त्यांच्या कार्यालयात एक बैठक बोलावली होती. या बैठकीस ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाचे तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. शहरातील डीजे तसेच साऊंड सिस्टम चालकांचे प्रतिनिधी, डॉ. महेश बेडेकर, ध्वनी मोजणी करणाऱ्या यंत्रणेचे प्रतिनिधी आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते. सुमारे तीन तास सुरू असलेल्या बैठकीत आगामी काळातील उत्सवांमध्ये ध्वनिप्रदूषण होऊ नये यासंबंधी चर्चा करण्यात आली.
आवाज नियंत्रण यंत्र म्हणजे काय?  
ध्वनिक्षेपकांच्या आवाजावर नियंत्रण मिळविण्यासाठी आवाज नियंत्रक उपकरण बसविण्याचे आदेश ठाणे पोलिसांनी दिले असले तरी अशा प्रकारचे यंत्रच अस्वित्वात नसल्याचे ध्वनिक्षेपक ठेकेदारांचे म्हणणे आहे. ध्वनिक्षेपकाच्या आवाजावर नियंत्रण मानवी हाताळणीनेच मिळविता येते. त्यासाठी कोणतेही उपकरण नसते, असे ठेकेदारांनी सांगितले. मात्र पोलिसांनी असे उपकरण न बसविल्यास कारवाई करण्याचे आदेश ठेकेदारांना दिले आहेत.
उत्सव मंडळांना सूचना
*उत्सवाकरिता ध्वनिक्षेपकांचे दिवाळ (ध्वनिक्षेपकाची एकावर एक थप्पी) उभे करण्याऐवजी उत्सवाच्या इतरत्र भागांत छोटे-छोटे ध्वनिक्षेपक बसवावेत, जेणेकरून इतरांपर्यंत आवाज जाईल.
*वाहनांमध्ये वेग रोखण्यासाठी विशिष्ट यंत्रणा असते, त्याच्या माध्यमातून वेगावर नियंत्रण करण्यात येते. त्यामुळे वाहन त्या वेगाच्या पुढे धावू शकत नाहीत. त्याचप्रमाणे ध्वनिक्षेपकामध्ये आवाज नियंत्रक उपकरणे बसवावीत.
*सर्वोच्च न्यायलयाने ध्वनिप्रदूषणासंबंधी ठरवून दिलेल्या आवाजाची पातळी ओलांडली तर कारवाई करण्यात येईल.