१३५१ मुंबईकरांना पालिकेची नोटीस
घरात डास घोंघावताहेत.. पाण्यात अळ्या झाल्यात.. सांभाळा! सावध व्हा! आणि ठोस उपाययोजना करून डास उत्पत्ती स्थाने नष्ट करा.. अन्यथा न्यायालयात खेटे घालण्याची वेळ ओढवेल. डेंग्यू आणि हिवतापावर नियंत्रण मिळविण्यासाठी डास प्रतिबंधक उपाययोजनांबाबत जनजागृती करूनही घरात अळ्यांची उत्पत्ती रोखण्यात असमर्थ ठरलेल्या तब्बल १३५१ मुंबईकरांना पालिकेने न्यायालयात खेचले आहे. त्यामुळे या मुंबईकरांवर न्यायालयात खेटे घालण्याची वेळ आली आहे.
पावसाळ्यात डेंग्यू, हिवतापासारख्या साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पालिकेने संपूर्ण मुंबईत जनजागृती मोहीम हाती घेतली होती. सोसायटय़ांमध्ये भित्तीपत्रके देऊन रहिवाशांना सजग करण्याचे प्रयत्न पालिकेकडून करण्यात आले. त्याचबरोबर पालिका शाळांतील विद्यार्थ्यांनाही डास प्रतिबंधक उपाययोजनांची माहिती देऊन या मोहिमेत सहभागी करून घेण्यात आले होते. सार्वजनिक ठिकाणे, रुग्णालये आदी ठिकाणी भित्तीपत्रके प्रदर्शित करून डास प्रतिबंधक उपाययोजनांची माहिती नागरिकांना देण्याचा प्रयत्नही करण्यात आला पान ५ पाहा
दंडाची शिक्षा
घरातील डासांच्या अळ्यांच्या उत्पत्तीचा बंदोबस्त करण्यात अपयशी ठरणाऱ्या मुंबईकरांना महापालिका अधिनियम १८८८ च्या कलम ३८ (ब) नुसार सुमारे दोन हजार रुपये ते १० हजार रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा करण्याची तरतूद आहे. त्यानुसार खटल्याअंती सबंधितांवर दंड ठोठावण्यात येतो.
=-=-=
डासांना आवरा, अन्यथा
कोर्टाची पायरी चढा!
पान १ वरून होता. प्रतिबंधक उपाययोजनांचा प्रसार आणि प्रचार करूनही डास निर्मूलनात अपयशी ठरलेल्या मुंबईकरांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला होता. जानेवारीपासूनच पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घरोघरी फिरून डास प्रतिबंधक उपाययोजना केल्या आहेत की नाहीत, घरात डासांच्या अळ्या आहेत का याची पाहणी सुरू केली. या अळ्यांचे डासांमध्ये रूपांतर झाल्यावर साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. प्रचार आणि प्रसार करूनही डासांची उत्पत्ती रोखण्यात अपयशी ठरलेल्या तब्बल १३५१ जणांच्या घरी पालिका कर्मचाऱ्यांना डासांच्या अळ्या आढळून आल्या. अळ्या आढळून आल्यास संबंधित मुंबईकरांविरुद्ध खटला दाखल करण्याचे अधिकार घरोघरी फिरून पाहणी करणाऱ्या कनिष्ठ आवेक्षकांना देण्यात आले आहेत. त्यामुळे या कनिष्ठ आवेक्षकांनी १३५१ मुंबईकरांविरुद्ध खटला दाखल केला आहे. या खटल्याची सुनावणी दादरच्या शिंदेवाडी न्यायालयात सुरू आहे