काँग्रेसचा ७०-३१ जागांचा राष्ट्रवादीला प्रस्ताव
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला फक्त ३१ जागा सोडण्याची तयारी काँग्रेसने दर्शविली असून, फारच ताणून धरल्यास आणखी तीन-चार जागांवर समझोता करण्याचा पवित्रा काँग्रेसने घेतला आहे. राष्ट्रवादीला हा प्रस्ताव मान्य होणे कठीण असल्याने आघाडीचे भवितव्य टांगणीला बांधले आहे.
महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात व्यूहरचना ठरविण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे आदी नेत्यांच्या उपस्थिीत आढावा घेण्यात आला. संघर्ष समितीने २७ गावांतील प्रभागांच्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस पक्ष संघर्ष समितीबरोबर असून, या गावांमधील २१ प्रभागांमध्ये उमेदवार उभे न करण्याचा निर्णय घेण्यात आला. उर्वरित १०१ पैकी ७० जागा काँग्रेसने, तर ३१ जागा राष्ट्रवादीने लढवाव्यात, असा प्रस्ताव काँग्रेसने ठेवला आहे. गेल्या निवडणुकीत ६० टक्के काँग्रेस, तर ४० टक्के जागा राष्ट्रवादीने लढविल्या होत्या. यंदा राष्ट्रवादीची स्थिती चांगली नसल्याने गतवेळ एवढय़ा जागा सोडायच्या नाहीत, असा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. राष्ट्रवादीने फारच आग्रह धरल्यास ३५ पेक्षा जास्त जागा सोडू नयेत, असा काँग्रेसचा प्रयत्न आहे. कल्याणचे निरीक्षक मधू चव्हाण आणि संजय चौपाने यांनी प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती दिली. राष्ट्रवादीच्या भूमिकेविषयी काँग्रेस नेत्यांच्या मनात संशयाची भावना असून, राष्ट्रवादी भाजपला मदत करण्याची भूमिका घेईल, असा विषय बैठकीत झाल्याचे समजते.

सरकारच्या काळ्या कारभाराची पुस्तिका
भाजप सरकारच्या एक वर्षांच्या काळ्या कारभाराची पुस्तिका काढून सत्ताधारी भाजपला उत्तर देण्याचा निर्णय काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आमदारांच्या बैठकीत सरकारच्या विरोधात अधिक आक्रमक होण्यावर भर देण्यात आला. इंदू मिलचा निर्णय काँग्रेस सरकारच्या काळात झाला होता, पण त्याचे सारे श्रेय भाजप घेत असल्याकडे अंनत गाडगीळ आणि नसिम खान यांनी लक्ष वेधले. सरकारच्या कारभाराच्या विरोधात पुस्तिका काढून सरकारचा बुरखा फाडण्याचा निर्णय घेण्यात आला. आमदार सुनील केदार यांनी पक्षांतर्गत वाद आता तरी मिटवा, अशी व्यथा व्यक्त केली.