२७ ऑगस्ट २०१६. पहाटे साडेचार वाजता एक महिला घाबरलेल्या अवस्थेत छत्रपती शिवाजी रेल्वे पोलीस ठाण्यात आली. तिची दोन वर्षांची मुलगी वैष्णवी हिला सीएसटी रेल्वे फलाटावरून कुणी तरी पळवून नेलं होतं. कसलाही दुवा नसताना त्या चिमुकलीला शोधून तिच्या अपहरणकर्त्यांना पकडण्याचं मोठं आव्हान रेल्वे पोलिसांसमोर होतं.

वर्षां धवसे (२५) ही महिला अंधेरी चार बंगला येथील एका वसाहतीत पतीसह राहत होती. तिला वैष्णवी नावाची दोन वर्षांची मुलगी होती. त्या वेळी वर्षां सात महिन्यांची गर्भवती होती. परंतु पतीसोबत तिचे भांडण झाल्याने ती गावाला बुलढाण्यात आईकडे जाण्यासाठी निघाली होती. सोबत चिमुकली वैष्णवी होती. २६ ऑगस्टच्या रात्री ती सीएसटी स्थानकात आली. परंतु तिची गाडी चुकल्याने ती रात्रभर फलाटावर थांबली होती. सकाळी दहाच्या दुसऱ्या गाडीने जायचा तिने विचार केला. रात्रीच्या वेळी वर्षांला एक दाम्पत्य भेटले. त्यांनी वर्षांची विचारपूस करून ओळख वाढवली, खायला दिले. पतीशी भांडून घर सोडलेल्या वर्षांला त्या महिलेने धीर दिला. आम्हाला पण गावी जायचंय असं सागून तिच्यासोबत थांबले. आपल्या सोबतीला कुणी तरी चांगले लोकं भेटले म्हणून वर्षांला धीर आला होता. पहाटे चार वाजता वर्षांला जाग आली तेव्हा तिची चिमुकली वैष्णवी जागेवर नव्हती. ते दाम्पत्यही गायब झाले होते.

मध्य रेल्वेच्या पोलीस उपायुक्त रुपाली खैरमोडे-अंबुरे यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी सूचना दिल्या. विविध पथके बनवली. रेल्वेच्या स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घनवटे यांनी हालचाली सुरू केल्या. स्थानकातील सर्व सीसीटीव्ही तपासण्यात आले. एका सीसीटीव्हीत एक दाम्पत्य एका मुलीला घेऊन टॅक्सीत बसत असल्याचे दिसले. परंतु नेहमीप्रमाणे त्या सीसीटीव्हीचे चित्रण स्पष्ट नव्हते. टॅक्सीचा नंबर नीट दिसत नव्हता. पण ती सॅण्ट्रो टॅक्सी होती आणि टॅक्सीवर एक स्टीकर होते हे समजले. पहाटेच्या वेळी या भागात येणाऱ्या सर्व सॅण्ट्रो टॅक्सीवाल्यांना बोलावून चौकशी करण्यात आली. पाच सॅण्ट्रो टॅक्सीवाले त्या वेळेत आले होते. त्यांच्याकडे चौकशी केली. तेव्हा एकाने सीसीटीव्हीतून काढलेले दाम्पत्याचे फोटो पाहिले आणि ते आपल्याच गाडीत बसल्याचे ओळखले. त्यांना मी मशीदबंदरला सोडल्याची माहिती दिली. टॅक्सीवाला सापडला पण पुढे काय? त्याने त्या जोडप्याला मशीदबंदरला सोडले होते. पुढे त्यांना शोधायचे कसे? ते कुठे गेले असतील? पोलिसांसमोर पुन्हा यक्षप्रश्न उभा राहिला. त्याच वेळी या टॅक्सीचालकाने एक महत्त्वाची माहिती दिली. हे जोडपे पनवेलला जायचं आहे असं आपापासात बोलत असताना ऐकल्याचं तो म्हणाला. बस्स! पोलिसांना दुवा मिळाला. हे जोडपे पनवेलला जाणार होते. मशीदबंदरहून कुठल्याही स्थानकात ते उतरले असतील म्हणून सर्व स्थानकांमधील सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली. पोलिसांचे वेगवेगळे पथक मशीदबंदरपासून अगदी खोपोलीपर्यंतच्या सर्व स्थानकातील सीसीटीव्ही तपासू लागले होते. मशीदबंदरातून या जोडप्याने दादरला जाणारी ट्रेन पकडली. त्यामुळे पोलीस चक्रावले. दादर स्थानकात ते जोडपे उतरले. ते दादरला का उतरले याचा पोलिसांना उलगडा होईना. पनवेलला जायचं मग दादरला का? सीसीटीव्हीत स्वामीनारायण मंदिराबाहेर ते जोडपे दिसले. टॅक्सीने ते जोडपे गेले असते तर पुढचा मार्ग खुंटणार होता. त्यामुळे पोलिसांची आशा मावळत चालली होती.

पण पोलिसांनी हिम्मत सोडली नव्हती. काहीही करून त्यांना शोधायचे होते. वास्तविक हे जोडपे चकवा देण्यासाठी हेतुपुरस्सर दादर स्थानकात उतरले होते आणि प्रीतम हॉटेलच्या बाहेरून दुसरी टॅक्सी करून वडाळा स्थानकात आले आणि तेथून ते पनवेलला गेले होते. दादरनंतर जोडपे दिसेनासे झाल्याने पोलीस थोडे निराश झाले होते. पण त्यांनी पनवेल स्थानकातले सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली. त्या वेळी त्यांना पनवेल स्थानकात हे जोडपे दिसले. पोलिसांनी अचूक माग घेतला होता. परंतु खरी लढाई पुढे होती.

पनवेल स्थानकातील सर्व रिक्षाचालकांकडे मुलीचा आणि त्या दाम्पत्याचा फोटो दाखवून विचारपूस करायला सुरुवात केली. जवळपास दीडशे-दोनशे टॅक्सीचालकांकडे चौकशी केली, पण त्या पहाटे असे दाम्पत्याला पाहणारा कुणीच आढळला नाही. पनवेल आगारातून अनेक बसेस सुटतात. तेथून तर हे दाम्पत्य फरार झाले नसतील ना, असा विचार पोलिसांनी केला. २८ ऑगस्टच्या पहाटे पनवेल स्थानकातून सुटणाऱ्या सर्व एसटी बसेसची माहिती घेतली. पण तरी काही माहिती हाती लागली नाही.  त्या वेळी पोलिसांना माहिती मिळाली की, पनवेलजवळून सहा आसनी टमटम रिक्षाही सुटतात. शेवटचा प्रयत्न म्हणून पोलिसांनी सर्व टमटम रिक्षाचालकांकडे चौकशी सुरू केली. एका रिक्षाचालकाने  त्यांना वडघर येथे सोडल्याचे सांगितले. वडघर उर्दू शाळेच्या मागे एका इमारतीचे बांधकाम सुरू होते. पोलिसांनी लगेच तेथे छापा घातला आणि या दाम्पत्याला ताब्यात घेऊन मुलीची सुटका केली.

सुप्रिया बसवंत (२५) आणि विजय बसवंत (२५) अशी या जोडप्यांची नावे आहेत. ते मूळचे बिहार राज्यातले. या दोघांचे पूर्वी लग्न झाले होते. परंतु त्यांनी मुंबईत आल्यावर एकमेकांशी लग्न केले. त्यांना मूल होत नव्हते. त्यामुळे मूल पळविण्याची त्यांनी योजना बनवली होती. योजनेनुसार ते २६ ऑगस्टच्या रात्री सीएसटी स्थानकात सावज शोधायला आले होते. त्यांना वर्षां दिसली आणि सोपे सावज सापडले होते. पोलिसांना या प्रकरणात सीसीटीव्हीची मदत झालीच, परंतु त्या टॅक्सीचालकाने जोडप्याचे संभाषण ऐकले आणि ते पनवेलला जाणार असल्याचे समजले होते. टॅक्सीतल्या संभाषणातला हाच दुवा पोलिसांच्या कामी आला आणि अपहृत चिमुकलीची सुटका झाली.

सुहास बिऱ्हाडे