मुंबई: डॉक्टरांचे मनुष्यबळ अपुरे असल्याने बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसच्या तृतीय वर्षांच्या जवळपास तीनशे विद्यार्थ्यांना सेवा देण्यासाठी हजर राहण्याचे आदेश महाविद्यालय प्रशासनाने दिले आहेत.

कूपर रुग्णालयात सध्या १८० खाटा करोना रुग्णांसाठी उपलब्ध आहेत. उर्वरित खाटा इतर आजाराच्या रुग्णांसाठी राखीव आहेत. रुग्णालयात आधीच अपुरे मनुष्यबळ असल्याने करोना रुग्णांना सेवा देताना डॉक्टरांसह परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे. त्यात पालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणखी दोनशे खाटा वाढविण्याचे आदेश दिले आहेत.

बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या कूपर रुग्णालयात डॉक्टरांची मोठय़ा प्रमाणात आवश्यकता असल्याने आता प्रशासनाने एमबीबीएसच्या तृतीय वर्षांच्या प्रथम आणि द्वितीय सत्राच्या तीनशे विद्यार्थ्यांना सेवेसाठी हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. या विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्थाही रुग्णालय आवारातच केली जाणार आहे.

जागा आहे म्हणून केवळ खाटा वाढविणे इतके सोपे नाही. प्रत्येक खाटेमागे डॉक्टरांसह, परिचारिका, वॉर्डबॉय, सफाई कर्मचारी यांचीही आवश्यकता असते. उपलब्ध करोना वॉर्डमध्ये काम करण्यासाठी डॉक्टर, परिचारिका अपुऱ्या आहेत. त्यात आता वाढीव खाटांसाठी मनुष्यबळ कोठून आणणार याचा विचारही पालिकेने करायला हवा, असे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले. या विद्यार्थ्यांना करोना रुग्णांच्या सेवेसाठी पाठविण्यात येणार नसून अन्य वैद्यकीय कामांसाठी बोलाविले असल्याची माहिती महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. पिनाकिन गुज्जर यांनी सांगितले.