16 February 2019

News Flash

कूपर रुग्णालयात अखेर अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळणार

मुंबईतील अन्य चार केंद्रे लवकरच सुरू होणार असली तरी ठाणे आणि नवी मुंबईतील तीन केंद्रे मात्र अजूनही प्रतीक्षेतच आहेत.

याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’ने ४ मे २०१८ रोजी प्रसिध्द केले.

अपंगत्वाचे प्रमाणपत्र देणारे एकच केंद्र प्रत्यक्ष सुरू ; नवी मुंबई , ठाण्यातील केंद्र मात्र अजूनही प्रतीक्षेत!

शहरातील अपंग व्यक्तींना स्थानिक ठिकाणीच अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी सुरू करण्यात येणाऱ्या सात केंद्रांपैकी जुहू येथील कूपर रुग्णालयामध्ये गुरुवारी एक केंद्र सुरू झाले. मुंबईतील अन्य चार केंद्रे लवकरच सुरू होणार असली तरी ठाणे आणि नवी मुंबईतील तीन केंद्रे मात्र अजूनही प्रतीक्षेतच आहेत.

मुंबई महानगर प्रदेशामध्ये अपंगत्व प्रमाणपत्र देणारे जे. जे. रुग्णालय हे एकमेव केंद्र असल्याने राज्य सरकारने मुंबई, ठाणे भागामध्ये मिळून सात रुग्णालयांमध्ये ऑनलाइन पद्धतीने प्रमाणपत्र देण्याची सुविधा सुरू करण्याचे ऑक्टोबर २०१७ मध्ये शासन निर्णयाद्वारे जाहीर केले. यामध्ये मुंबईतील केईएम, शीव, नायर, कूपर आणि राजावाडी या पालिका रुग्णालयांचा समावेश आहे. सरकारच्या निर्णयानंतर ही केंद्रे सुरू न झाल्याने ‘अपंगत्वाचे प्रमाणपत्र देणाऱ्या केंद्रांची प्रतीक्षा’ या मथळ्याखाली ‘लोकसत्ता’ने ४ मे २०१८ रोजी वृत्त प्रसिद्ध करून या केंद्रांचा हलगर्जीपणा समोर आणला होता. त्यानंतर या रुग्णालयांचे अनेक काळ रखडलेले प्रशिक्षण १३ मार्च रोजी ठाणे जिल्हा रुग्णालयात घेतले गेले. मुंबईतील पाचही रुग्णालयांना केंद्र सुरू करण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात आली आहे. यातील कूपर येथील रुग्णालयामध्ये अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्याचे केंद्र गुरुवारी सुरू झाले. आठवडय़ाच्या दर बुधवारी केंद्राचे कामकाज सकाळी १० ते ३ या वेळेत चालू असेल.

ठाणे,नवी मुंबईतील रुग्णालयांकडून प्रतिसाद नाही

ठाणे येथील कळव्याचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि ओरस येथील लोकमान्य रुग्णालय आणि नवी मुंबईतील वाशी येथील पालिका रुग्णालय यांचा वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप या केंद्रांनी प्रतिसाद दर्शविलेला नाही. त्यामुळे या केंद्रांचे काम रखडलेले असल्याची माहिती आरोग्य संचालनालयातील अधिकाऱ्यांनी दिली.

First Published on September 1, 2018 3:39 am

Web Title: cooper hospital will finally get disability certificate