कर्जमाफी योजनेच्या लिंकऐवजी ‘कँडी क्रश’

मुंबई : शेतकरी कर्जमाफीची माहिती देणाऱ्या मोबाइल लिंकऐवजी ‘कँडी क्रश’ गेमची लिंक शेतकऱ्यांना पाठविण्यात आल्याच्या गोंधळाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रभारी सहकार आयुक्त सतीश सोनी यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. शेतकरी कर्जमाफीसारख्या सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेसंदर्भात हलगर्जीपणामुळे किंवा जाणीवपूर्वक गोंधळ करण्यात आला असावा, असा ठपका ठेवत सोनी यांना सरकारने निलंबित केले आहे.

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफीची माहिती कृषी आयुक्तांमार्फत शेतकऱ्यांना पाठविण्यासाठी प्रभारी सहकार आयुक्तांनी ७ जानेवारी २०२० रोजी दोन पत्रे तयार केली होती. त्यापैकी एका पत्रामध्ये या योजनेची चुकीची यूआरएल लिंक देण्यात आली होती. तर अचूक यूआरएल लिंक असलेली दोन पत्रे कृषी आयुक्तांना ८ व ९ जानेवारीला पाठवून त्याची पोचपावती घेण्यात आली होती. पण कृषी आयुक्तांना ईमेल वर पाठविण्यात आलेल्या चुकीच्या यूआरएल लिंकनुसार त्यांनी कार्यवाही केली व शेतकऱ्यांना चुकीची लिंक पाठविली गेली. हा प्रकार जाणीवपूर्वक झाला असावा, असा संशय असून त्याची चौकशी केली जाणार आहे. त्यामुळेच सोनी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनीही त्यास दुजोरा दिला.

कर्जमाफी योजनेऐवजी गेमची लिंक शेतकऱ्यांना पाठविली गेल्याने गोंधळ उडाला होता. त्याची गंभीर दखल घेऊन सोनी यांच्यासारख्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याला निलंबित करण्याचा निर्णय मुख्यमंत्री ठाकरे यांनी घेतला आहे. सोनी यांना याआधीही एकदा निलंबित करण्यात आले होते. सहकार आयुक्तपदी कालच नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली होती.